Satyapal Malik on PM Modi : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. मलिक यांनी कृषी कायद्यांवरुन मोदी यांना फटकारले आहे. मलिक म्हणाले, मी राजीनामा घेऊन पीएम मोदींना समजावून सांगायला गेलो होतो, मात्र, ते गर्वात होते. त्यांनी शेतकऱ्यांशी बोलायला तयार नव्हते. अखेर त्यांनी शीख आणि जाटांच्या भीतीने कृषि कायदा मागे घ्यावा लागला. तसेच त्यांच्या भीतीमुळे ते गुरुद्वारामध्ये देखील जाऊ लागले, असा दावा मलिक यांनी केला.
सत्यपाल मलिक राजस्थानमधील सीकर येथील सुतोद दाव येथे वीर तेजाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. सत्यपाल मलिक म्हणाले की, सध्या देशात वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि रोजगारावर सरकारने अतिक्रमण केले आहे. आजही सरकार शेतमालाला भाव द्यायला तयार नाही.
शेतकरी आंदोलनादरम्यान राजीनामा खिशात ठेवून पंतप्रधान मोदींना भेटायला गेलो होतो, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. पाच मिनिटे त्यांच्यात वाद झाला. पंतप्रधान अहंकारी असल्याचा दावा मलिक यांनी केला. मी पंतप्रधानांना समजावून सांगितले की, शेतकाऱ्यांशी वाद योग्य नाही. हाच तो समुदाय आहे ज्यांच्या गुरूंनी आपल्या चार पुत्रांचे बलिदान दिले. त्यांनीच अकबराची कबर खोदून अंतिम संस्कार केले. त्यामुळे त्यांच्याशी बोलून तोडगा काढायला हवा.
मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदी शीखांच्या भीतीने गुरुद्वाराला भेट देतात. ते श्रद्धेने त्या ठिकाणी जात नाहीत. पीएम मोदींच्या ताफ्याला पंजाबमध्ये रोखण्यात आले. ही मिरवणूक होती पण अर्धा तास थांबल्यानंतर पीएम मोदी घाबरले आणि विमानतळावर आले. सत्यपाल मलिक म्हणाले की, राजस्थानमध्ये भाजपचे अस्तित्व नाही. या विधानसभा निवडणुकीत ते कुठेच दिसत नाही. राजस्थानमधून भाजपचा पूर्ण नायनाट होईल, असा दावा देखील मलिक यांनी केला.
संबंधित बातम्या