delhi Rangpuri mass suicide case : दक्षिण दिल्लीतील रंगपुरी गावात एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढले. चारही मुली अपंग असल्याने त्यांना चालता येत नव्हते. तसेच पत्नीच्या निधनानंतर मुलींची अवस्था पाहून वडील पूर्णपणे हताश झाले होते. त्यामुळे मुलींना विषारी औषध खाऊ घालून वडिलांनी देखील आत्महत्या केली. घरातून वाय येऊ लागल्याने शेजऱ्यांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
हिरालाल (वय ५०) असे वडिलांचे नाव आहे. तर नीतू (वय १८), निशी (वय १५), नीरू (वय १०), निधी (वय ८) अशी चार मृत मुलींची नावे आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले वर्षीय हिरालाल हे आपल्या कुटुंबासोबत रंगपुरी गावात भाड्याच्या घरात राहत होते. हिरालाल हे मूळचे बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मसरख गाव येथील रहिवासी आहे त्यांच्या पत्नीचे आधीच निधन झाले असून ते नीतू, निशी, नीरू आणि निधी अशा चार मुलींसोबत राहत होते.
हिरालाल हे वसंतकुंज येथील रुग्णालयात सुताराचे काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी हिरालाल यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. यावर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून ही माहिती दिली.
पोलिस जेव्हा वसंत कुंज दक्षिण भागात असलेल्या हिरालाल याच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा आसपासच्या लोकांनी सांगितले की अनेक दिवसांपासून हे कुटुंब दिसत नव्हते. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा आतून शरीर कुजण्याचा वास येत होता. पोलिसांचे पथक खोलीत गेले तेव्हा पहिल्या खोलीच्या बेडवर हिरालालचा मृतदेह पडलेला होता. तर चारही मुलींचे मृतदेह दुसऱ्या खोलीत पडले होते. पोलिसांनी सांगितले की, दिल्लीत राहणारा हिरालालचा मोठा भाऊ जोगिंदल याला या घटनेची माहिती देण्यात आली. कुटुंबाने विषारी प्राशन खाऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसली तरी या घटनेमागे मुलींचे अपंगत्व हे कारण मानले जात आहे.
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून टीमने घटणस्थळाचे आणि अन्नाचे नमुने गोळा केले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोस्टमॉर्टमनंतर व्हिसेरा तपासासाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल
हिरालाल यांच्या पत्नी सुनीता या कर्करोगाने त्रस्त होत्या. खूप उपचार करूनही त्या वाचू शकल्या नाहीत. या जोडप्याची पहिली मुलगी अपंग जन्माला आली होती. सुदृढ मुलं व्हावी या इच्छेपोटी आणखी तीन मुलींचा जन्म झाला. पण त्या तिघीही अपंग होत्या. हिरालाल त्यांची काळजी घेत होते.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चारही मुली बेडवर पडल्या होत्या. हिरालाल त्यांना सकाळी जेवण देऊन जायचे. ते घरी परत येईपर्यंत मुली भुकेल्या आणि तहानलेल्या राहायच्या. हिरालाल घरी परतल्यानंतर मुलींची काळजी घेत असे. त्यांच्यासाठी जेवण बनवायचे आणि नंतर घर स्वच्छ करायचे. एक तर दिवसभर काम करून घर चालवणं आणि रात्री मुलींची काळजी घेणं यामुळे हिरालाल हताश झाले होते. त्यांची हिंमत हळूहळू खचू लागली. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, कामाच्या दबावामुळे देखील हिरलाल नैराश्यात गेले असावे. आणि त्यामुळे त्यांनी शेवटी मुलींसह जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बिल्डिंग केअरटेकर शैलेंद्र यांनी सांगितले की, हिरालाल यांचे कुटुंब चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आठ वर्षांपासून राहत होते. त्यांच्या विविध समस्यांमुळे हे कुटुंब लोकांशी फारसे मिळत जुळत नव्हते. या कुटुंबामुळे कुणालाही कधीही अडचणीचा सामना करावा लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल यांना २४ सप्टेंबर रोजी शेवटचे पाहिले होते. तेव्हापासून ते कुणालाही दिसले नाही. बंगाली मार्केटमध्ये राहणारा हिरालालचा भाऊ जोगिंदर आणि मेहुणी गुडिया यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणी गुडिया, घरमालक आणि इमारतीचा केअरटेकरसह सहा जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहे. त्याचवेळी पोलिसांनी हिरालालचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हिरालाल यांच्याही नाकातून रक्त येत होते. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजू लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. या घटनेबाबत आणखी लोकांची चौकशी केली जाणार आहे.