rajasthan crime news : राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालमत्तेवरून वडील आणि मुलामद्धे वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात ४२ वर्षीय वडिलांनी आपल्या २० वर्षांच्या मुलाच्या डोक्यात गोळ्या घालून त्याची हत्या केली. त्याचा खून केल्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हनुमानगढ जिल्हा पोलिस ठाण्याचे प्रभारी अजय गिरधर यांनी सांगितले की, शनिवारी रात्री आरोपी बाप हा दारूच्या नशेत होता. रात्री जेवण करून त्यांचा मुलगा झोपायला जात होता. यावेळी दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद झाला होता. दरम्यान मुलगा रात्री झोपल्यावर आरोपी बापाने आपल्या मुलाच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि त्यानंतर काही मिनिटांनी ज्या पिस्तुलातून गोळी झाडून मुलाचा खून केला त्याच पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडत त्याने आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप बिश्नोई असे या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ति शेतकरी होता. सौरव बिश्नोई असे त्याने खून केलेल्या त्याच्या मुलाचे नाव आहे. तो गोलूवाला येथील स्थानिक शासकीय महाविद्यालयातील रहिवाशी आहे.
आरोपीची रोही गावात मालमत्ता आहे. ही मालमत्ता रामस्वरूपला खूप दिवसांपासून विकायचे होती. मात्र, ती मालमत्ता विकण्यापूर्वी सौरवला दुसरी मालमत्ता खरेदी करायची होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये यावरून बाचाबाची झाली होती. रामस्वरूप त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. रागाच्या भरात त्याने आपल्या मुलाची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली.
पोलिसांनी सांगितले की, खून आणि नंतर आत्महत्येची घटना घडल्यानंतर शेजारी राहणाऱ्या राम स्वरूपच्या भावासह अनेक लोक घटनास्थळी पोहोचले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या व्यक्तीकडे शस्त्र कसे आले याचाही आम्ही तपास करत आहोत, असे एसएचओने सांगितले.
संबंधित बातम्या