Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा राडा, शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा राडा, शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या

Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा राडा, शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या

Dec 08, 2024 07:32 PM IST

Farmer Protest March : किमान हमीभाव व आपल्या इतर मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी पंजाब-हरियाणाच्या सीमेवरच अडवलं आहे. या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नकळांड्या फोडल्या.

शंभू बॉर्डरवर पोलीस व आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट
शंभू बॉर्डरवर पोलीस व आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट (Harmeet Sodhi)

Farmers Protest March Towards Delhi :  शंभू बॉर्डरवरून दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांच्या तुकडीला हरियाणा पोलिसांनी रोखले आहे. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी शेतकऱ्यांना परवानगीशिवाय दिल्लीला जाता येणार नसल्याचे सांगितले. हे शेतकरी शस्त्र घेऊन आले होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे. यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावर हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे सोडले, ज्यामुळे गोंधळ उडाला. बीकेयूचे रेशम सिंह अश्रुधुराच्या गोळ्याने जखमी झाले आहेत. अशा तऱ्हेने पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराचे गोळे सोडले आणि शेतकऱ्यांना माघार घेण्यास भाग पाडले. शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

शेतकरी शस्त्र घेऊन आलेत, पोलिसांचा आरोप -

हरियाणा पोलिसांनी सांगितले की, आम्ही आधी शेतकऱ्यांची ओळख पटवू आणि नंतर त्यांना सोडून देऊ. आमच्याकडे १०१ शेतकऱ्यांच्या नावांची यादी असून ते शेतकऱ्यांचा नियोजित गट म्हणून नव्हे तर जमाव म्हणून फिरत आहेत.  ते आम्हाला स्वतःची ओळखपत्रे दाखवत नाहीत. शेतकरी शस्त्रे घेऊन आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पुढे जाऊ देता येणार नाही. शेतकरी नेते वनसिंग पंढेर म्हणाले, 'आम्ही १०१ शेतकऱ्यांची यादी जाहीर केली असून ते तेच शेतकरी आहेत.

सरकार शेतकऱ्यांना टाळत आहे -

सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस आणि सिरसाच्या खासदार कुमारी शैलजा यांनी केला आहे. कुमारी शैलजा यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर लिहिले की, शेतकऱ्यांना आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे कूच करायचे आहे, पण त्यांना रोखले जात आहे. शेतकऱ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असून सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असे असूनही सरकार वाटाघाटी करण्यास टाळाटाळ करीत आहे.

कुमारी शैलजा म्हणाल्या की, हरियाणा, पंजाब, शंभू आणि इतर राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत, ज्यावरून सरकार दळणवळणाचे मार्ग बंद करत आहे आणि लोकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. रविवारी हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर शेतकरी 'दिल्लीकडे कूच' करण्यासाठी धडपडत होते.

शंभू बॉर्डरवर सुरक्षा वाढवली - 

शेतकऱ्यांचा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न पाहता पंजाब-हरियाणा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. कलम १६३ (पूर्वीचे कलम १४४) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देखील सीमेवर लागू आहेत. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे. पोलिसांच्या १३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर