हरियाणा आणि पंजाबला जोडणाऱ्या शंभू बॉर्डरवर आज दिवसाची सुरुवात तणावपूर्ण स्थितीत झाली होती. मात्र आता थोडे दिलासादायक चित्र आहे. शेतकऱ्यांनी आज दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली असून ते जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान केंद्र सरकारने बातचीत करण्याचा प्रस्ताव ठेवला असून यामुळे शंभू बॉर्डरवर पुन्हा शांतता दिसून येत आहे.
वृत्त आहे की, शेतकरी नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. त्यामध्ये मंथन केले जात आहे की,सरकारच्या प्रस्तावावर काय निर्णय घ्यावा. संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित गुरनाम सिंह चढ़ूनी यांनी सरकारच्या ऑफरचे स्वागत केले आहे.
तत्पूर्वी दिल्लीच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरच रोखलं. दरम्यान,आज दुपारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. परंतु,पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रूधुराचा मारा केला. अश्रूधुराच्या माऱ्यानंतर शंभू सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. आंदोलक शेतकरी सैरावैरा धावू लागले. तर या सीमेवर अधिक पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आहे.
दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मजबूत तटबंदी केली आहे. मात्र शेतकऱ्यांनी हे बॅरिकेट्स हटवून दिल्लीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. तब्बल १४ हजार शेतकरी १२०० ट्रॅक्टर्स घेऊन शंभू सीमेवर उभे आहेत.
संबंधित बातम्या