पंजाबमधील शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी बहुस्तरीय बॅरिकेडिंग, अश्रुधुराचे गोळे आणि वॉटर कॅननचा वापर केला आणि आज पुन्हा त्यांचा दिल्लीकडे जाणारा मोर्चा हाणून पाडला. विनापरवानगी दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे सोडले आणि वॉटर कॅननचा वापर केला. या घटनेत आठ शेतकरी जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला चंदीगड पीजीआयमध्ये पाठविण्यात आले आहे. रविवारी शंभू सीमेवरून शेतकऱ्यांची तुकडी मागे परतली. शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर शेतकऱ्यांना परत घेण्यासाठी गेले होते.
शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर म्हणाले की, उद्याच्या बैठकीनंतर पुढील वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांचा गट पुढे कधी पाठवायचा याचा निर्णय घेतला जाईल. आजही ७ ते ८ शेतकरी जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतर त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे किंवा त्यांना दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी. ते म्हणाले की, शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आपल्या संघर्षासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी ते मागे हटणार नाहीत.
हरयाणा पोलिसांनीही पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला. मात्र, हरयाणा प्रशासनाने टाकलेल्या फुलांमध्ये रसायने मिसळल्याने शेतकरी जखमी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना आल्याचा चहा, बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या ही दिल्या. शेतकऱ्यांच्या दिल्लीतील मोर्चाबाबत केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी म्हणाले, 'राजमंत्र्यांनी सांगितले आहे की, मोर्चा काढण्याची गरज नाही. त्यांच्या पाच प्रतिनिधींनी येऊन सरकारशी चर्चा करावी. सरकार चर्चेला तयार आहे. अशा तऱ्हेने मोर्चा काढून राजकारण केले जात आहे. पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या स्थितीची चिंता आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा दुप्पट फायदा होतो. त्यांनी एमएसपी वाढवण्याची भाषा केली आहे, मग आंदोलन कशासाठी आहे?
हरियाणा पोलिसांनी सांगितले की, आम्ही आधी शेतकऱ्यांची ओळख पटवू आणि नंतर त्यांना सोडून देऊ. आमच्याकडे १०१ शेतकऱ्यांच्या नावांची यादी असून ते शेतकऱ्यांचा नियोजित गट म्हणून नव्हे तर जमाव म्हणून फिरत आहेत. ते आम्हाला स्वतःची ओळखपत्रे दाखवत नाहीत. शेतकरी शस्त्रे घेऊन आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पुढे जाऊ देता येणार नाही. शेतकरी नेते वनसिंग पंढेर म्हणाले, 'आम्ही १०१ शेतकऱ्यांची यादी जाहीर केली असून ते तेच शेतकरी आहेत.
संबंधित बातम्या