Farmers Agitation : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Farmers Agitation : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Farmers Agitation : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Feb 16, 2024 12:08 PM IST

दिल्लीच्या सीमेवर १३ फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबच्या एका शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याला पतियाळा येथील शासकीय राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Elderly farmers at the protest site at Shambhu on the Punjab-Haryana border on Friday morning. (Ravi Kumar/HT)
Elderly farmers at the protest site at Shambhu on the Punjab-Haryana border on Friday morning. (Ravi Kumar/HT)

पंजाब-हरयाणा सीमेवरील गेल्या १३ फेब्रुवारीपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. हरयाणा सरकारने शेतकऱ्यांना शंभू सीमेवर अडथळे निर्माण करून रोखून धरले आहेत. दरम्यान, सीमेवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील ज्ञान सिंग (वय७०) या शेतकऱ्याचा आज, शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे. ज्ञान सिंग या शेतकऱ्याला पहाटे ४ वाजता राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना पतियाळा येथील शासकीय राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात आपत्कालीन विभागात अर्ध्या तास उपचार केल्यानंतर या शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

'या शेतकऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला' अशी माहिती राजिंद्र रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.

किमान हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतमालाला किमान हमी भाव मिळावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची हाक दिली होती. राजधानी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकरी संघटनांनी आज, १६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. हा बंद ग्रामीण भारतापुरता मर्यादित असेल. सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन संयुक्त किसान मोर्चानं केलं आहे. या बंदला समाजातील विविध कामगार संघटना तसेच मान्यवर व्यक्तिंनी पाठिंबा दिला आहे.

'सेंट्रल ट्रेड युनियन्स (CTUs) आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) यांनी आज, १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रामीण भारतात बंदची हाक दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कॉर्पोरेट समर्थक, लोकविरोधी धोरणांचा सर्वात मोठा फटका कामगार वर्गाला बसत आहे. आम्ही सर्व जण या बंदला पाठिंबा जाहीर करत असल्याचे पत्र प्रा. प्रभात पटनायक (जेएनयू, दिल्ली), प्रा. इरफान हबीब (अलिगड मुस्लिम विद्यापीठ), प्रा. नसिर तय्यबजी (जमािया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठ), अनिल चंद्रा (सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते), प्रा. जयंती घोष (जेएनयू, दिल्ली), प्रा. के. एम. श्रीमाळी (दिल्ली विद्यापीठ), इंदिरा चंद्रशेखर (प्रकाशक), प्रा. बद्री रैना (दिल्ली विद्यापीठ), रामशरण जोशी (ज्येष्ठ पत्रकार), पी. साईनाथ (ज्येष्ठ पत्रकार), एम के रैना (दिग्दर्शक), राम रहमान (फोटोग्राफर) यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर