Who is Nigar Shaji? : भारताची पहिली सौर मोहिम असलेल्या आदित्य-L1 यान लांगरांग पॉइंट येथे यशस्वीपणे तैनात करण्यात आले आहे. हे यान पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर एल१ या पॉइंटवर स्थपित करण्यात आले आहे. इस्रोच्या या जटिल मोहिमेचे नेतृत्व प्रकल्प संचालिका निगार शाजी यांनी केले आहे. शाजी या अतिशय सौम्य स्वभावाच्या आहेत. त्यांनी या मिशनच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. हे मिशन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आठ वर्षे त्यांच्या टीमसोबत काम केले.
शाजी १९८७ मध्ये इस्रोमध्ये रुजू झाल्या. त्या भारताच्या पहिल्या सौर मोहिमेच्या प्रकल्प संचालक ठरल्या आहेत. याआधी त्यांनी रिसोर्ससॅट-2A च्या सहयोगी प्रकल्प संचालक म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. ही जबाबदारी आजही त्या पाहत आहेत. याव्यतिरिक्त त्या कमी कक्षेतील मोहिमा आणि ग्रह मोहिमांच्या कार्यक्रम संचालिका देखील राहिल्या आहेत. आंध्रप्रदेशच्या किनार्यावरील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रांवर त्यांनी त्यांच्या इस्रोमधील कार्यकाळाला सुरुवात केली. त्यानंतर त्या बेंगळुरू येथील यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यातील सेंगोटाई येथे मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या शाजीने तिरुनेलवेली, मदुराई कामराज विद्यापीठातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी सेनगोटाई येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवली. नंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
शाजी यांचे वडील शेख मीरान हे शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या मुलीला आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा दिली. "माझ्या लहानपणी माझ्या पालकांनी मला खूप साथ दिली. त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच मी इतक्या उंचीवर पोहोचले," असे शाजी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
इस्रोमध्ये महिलांना नेहमी प्रोत्साहित केले जाते. त्यांच्याशी भेदभाव केला जात नाही. वरिष्ठांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच शाजी या जबाबदाऱ्या लीलया पार पाडू शकल्या आहेत. शाजी या आई आणि मुलीसोबत बंगळुरूमध्ये राहतात. त्यांचे पती आणि मुलगा परदेशात नोकरी करतात.