मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ट्विटमुळे धार्मिक भावना दुखावल्या? दिल्ली पोलिसांकडून पत्रकाराला अटक
दिल्लीत पत्रकार मोहम्मद जुबेर यांना अटक
दिल्लीत पत्रकार मोहम्मद जुबेर यांना अटक
27 June 2022, 23:04 ISTHT Marathi Desk
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 23:04 IST
  • पत्रकार मोहम्मद जुबैर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली. धार्मिक भावना दुखावणे तसेच वैमनस्य निर्माण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांना त्यांना अटक केली आहे.

प्रसारमाध्यमे, समाज माध्यमांवरील माहिती तसेच जबाबदार व्यक्तींनी जाहीर वक्तव्यांतून दिल्या जाणाऱ्या माहितीची खातरजमा करणाऱ्या ‘अल्टन्यूज’ वेबसाइटचे सहसंस्थापक, पत्रकार मोहम्मद जुबैर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली. धार्मिक भावना दुखावणे तसेच वैमनस्य निर्माण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. '२०२० सालच्या एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पत्रकार मोहम्मद जुबैर यांना दिल्ली पोलिसांनी बोलावलं होतं. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता चौकशीअंती एका दुसऱ्याच प्रकरणात जुबैर यांना ताब्यात घेण्यात आलं’ असा आरोप ‘अल्टन्यूज’चे संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी ट्विटद्वारे केला आहे. जुबैर यांना अटक करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या कृतीचा कॉंग्रेस खासदार राहुल गांधी, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण तसेच खासदार शशी थरुर यांनी निषेध केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या प्रकरणी अल्टन्यूज वेबसाइटचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार जुबैर यांना एका जुन्या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी आज बोलावलं होतं. या प्रकरणात जुबैर यांना आधीपासून कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण प्राप्त होतं. परंतु पोलिसांनी तपासादरम्यान जुबैर यांच्या एका जुन्या ट्विटचे प्रकरण बाहेर काढले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना ताब्यात घेतले’ अशी माहिती सिन्हा यांनी दिली. शिवाय जुबैर यांना पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत दिली नसल्याचे सिन्हा म्हणाले.

काय होते प्रकरण?

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार जुबैर यांनी २०१८ साली एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोत एका हॉटेलचे आधीचे नाव बदलण्यात आल्याचे दिसून येत होतं. त्यात २०१४ पूर्वीचे नाव आणि २०१४ नंतरचे नाव, असे शीर्षक देण्यात आले होते. या फोटोमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार एका ट्विटर हॅंडलवरून दिल्ली पोलिसांना टॅग करून करण्यात आली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, कॉंग्रेस खासदार शशी थरुर यांनी जुबैर यांची तत्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आजच्या गढूळ राजकीय वातावरणात सगळीकडे खोट्या माहितीची सुळसुळाट झालेला असताना अल्टन्यूज ही चुकीच्या माहितीची खातरजमा करून सत्य माहिती मांडण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. त्यामुळे मोहम्मद जुबैर यांना तत्काळ सुटका करण्याची मागणी शशी थरुर यांनी केली आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग