Government Scheme: इंटरनेटवरून माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात काही वेळा चुकीचे अपडेट्स मिळण्याचा धोका असतो. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या नावाखाली लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकार प्रत्येक घरातील एका सदस्याला नोकरी देणार, असा दावा एका पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे. ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, अन्यथा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर युट्यूबच्या एका चॅनेलच्या थंबनेलचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यात असे लिहिले आहे की, संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार एक परिवार एक नोकरी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देत आहेे. या नोकरीमध्ये निरक्षर असलेल्या लोकांना दरमहा १६ हजार ५०० रुपये पगार दिला जाईल. तर, आठवी उत्तीर्णआणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांना अनुक्रमे २५ हजार आणि ३८ हजार रुपये पगार दिला जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी खाली फॉर्म देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. 'फॅमिली वन जॉब स्कीम'सारख्या फसवणुकीपासून सावध राहा, असे या अधिकृत हँडलने लिहिले आहे. केंद्र सरकार 'वन फॅमिली वन जॉब स्कीम'अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देत असल्याचा संभ्रम 'आपकीदुनिया १२४' हे युट्युब चॅनेल आपल्या युट्युब थंबनेलच्या माध्यमातून पसरवत आहे. ही योजना बनावट आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत सरकार परीक्षा न घेता भरती करत असल्याचा आणखी एक दावा चॅनेलवर करण्यात आला आहे. त्यावर पीआयबीने म्हटले की, 'सर्व शिक्षा अभियान भरती' अंतर्गत केंद्र सरकार थेट प्राथमिक शिक्षकांच्या पदांची भरती विनापरीक्षा करत असल्याचा दावा 'आपकीदुनिया १२४' वाहिनी आपल्या युट्युब थंबनेलच्या माध्यमातून करत आहे. सावध राहा, हा दावा खोटा आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार अशा प्रकारे कोणतीही भरती करत नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या