लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण तापलं आहे. १९ एप्रिल ते १ जून पर्यंत ७ टप्प्यात १८ व्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार मोहीम जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक अशी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामध्ये काही लोक आपल्या हातात पत्रके घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. त्यावर लिहिले आहे 'नो वोट टू बीजेपी'. याबाबत हा दावा केला जात आहे की, हे लोक प्लेकार्ड्सच्या माध्यमातून आगामी लोकसभा इलेक्शनसाठी हा संदेश देत आहेत.
अखेर या व्हिडिओ क्लिपची सत्यता काय आहे? हे लोक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे आवाहन करत आहेत का? इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार फॅक्ट चेकमध्ये हे उघडकीस आले आहे की, हा व्हिडिओ खूप जुना आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी हा व्हिडिओ समोर आला होता. फॅक्ट चेकमध्ये समजले की, हा व्हिडिओ 'नो वोट टू बीजेपी' नावाच्या यूट्यूब चॅनलवर १३ फेब्रुवारी २०२१ रोजी अपलोड केला होता. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले की, कोलकातामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी हे बॅनर दाखवले आहे. यामध्ये आवाहन केले होते की, भाजपाला मतदान करू नये.
रिपोर्टनुसार १६ फेब्रुवारी २०२१ रोजी हा व्हिडिओ 'नो वोट टू बीजेपी' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. त्यासोबत जे कॅप्शन लिहिले होते, त्यामध्ये म्हटले होते की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ही अपील करण्यात येत आहे. यामुळे स्पष्ट होते की, ही व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप नवीन नाही. २०२१ मध्ये बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात हा व्हिडिओ पहिल्यांदा समोर आला होता. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल केली जात असून म्हटलं जात आहे की, हे आवाहन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आहे. मात्र हा दावा पूर्णपणे असत्य आहे.