समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या निवडणूक प्रचारार्थ रोड शोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे रोड शो केला होता. या रोड शो दरम्यान जमलेले लोक त्यांच्यावर बूट आणि चप्पला फेकताना दिसत आहेत.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर बूमला हा दावा खोटा वाटला. त्यानंतर बूमने सपाच्या कन्नौजमधील आमदार रेखा वर्मा आणि एका स्थानिक पत्रकाराशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, रोड शो दरम्यान अखिलेश यांच्यावर त्यांचे समर्थक फुले आणि फुलांचे हार फेकत होते.
कन्नौज समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथे सपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. यावेळी अखिलेश यादव कन्नौज मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजपचे विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांचे आव्हान आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान अखिलेश यादव यांनी कन्नौजमध्ये भव्य रोज शो केला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, अखिलेश यादव बसच्या टपावर उभे राहून लोकांना अभिवादन करत आहेत. दरम्यान एका ‘एक्स’ युजरने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, कन्नौजमध्ये लोकांनी अखिलेश यादव यांच्यावर बूट आणि चप्पल फेकल्या. या घटनेचा आम्ही आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.
बूमला असे आढळले की, व्हिडिओमध्ये सपा नेत्यावर फुले आणि हार फेकले जात आहेत. त्यांच्यावर बूट आणि चप्पल फेकल्याचा व्हिडिओ खोटा आहे.
अखिलेश यादव यांनी २७ एप्रिल २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील कन्नौजच्या रसूलाबाद येथे रोड शो केला होता. बूमने आधी गुगलवर संबंधित घटनेचे कीवर्ड सर्च केले आणि यादव यांनी २७ एप्रिल रोजी कन्नौजमध्ये केलेल्या रोड शोबद्दल अनेक व्हिडिओ आढळले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान त्यांच्यावर बूट आणि चप्पलफेक केल्याचे एकाही वृत्तात नमूद करण्यात आले नव्हते.
त्याचबरोबर, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विकास यादवावाले (vikasyadavauraiyawale) या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वॉटरमार्क असल्याचे निदर्शनास आले. हा व्हिडिओ २ मे २०२४ रोजी या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल्याचे समोर आले. पोस्टची आर्काइव्ह लिंक पाहा व्हिडिओ येथे पाहता येईल.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कुठेही यादव यांच्यावर रोड शोदरम्यान बूट आणि चप्पल, स्लीपर फेकल्याचा उल्लेख नव्हता. व्हिडिओतील स्क्रीनशॉटचा आढावा घेतला असता रोड शो दरम्यान फुले आणि हार फेकले जात असल्याचेही स्पष्ट झाले.
अधिक माहितीसाठी व स्पष्टीकरणासाठी आम्ही कन्नौजचे स्थानिक रिपोर्टर पंकज श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. पंकज यांनी 'बूम'शी बोलताना सांगितले की, 'कन्नौज लोकसभा मतदारसंघातील बिधुना विधानसभा मतदारसंघात अखिलेश यादव यांनी रोड शो केला. अखिलेश आपल्या समाजवादी रथावर बसून जनतेला अभिवादन करत होते व त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत होते. यावेळी त्यांच्यासोबत सपाच्या स्थानिक आमदार रेखा वर्माही रथावर उपस्थित होत्या. यादव यांच्यावर बूट किंवा चप्पल फेकल्याची घटना घडली नाही. सर्वजण फुले आणि हार फेकत होते.
त्यानंतर बूमने सपाच्या आमदार रेखा वर्मा यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली. वर्मा म्हणाल्या की, यावेळी लोकांनी आपल्या नेत्यावर हार व फुलांचा वर्षाव केला. तसेच ते अखिलेश यादव व सपाच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करत होते. अखिलेश यादव यांच्या कन्नौजमधील रसूलाबाद येथील रोड शोचा व्हिडिओ समाजवादी पक्षाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही पाहता येणार आहे.