COVID-19: चीनमध्ये जन्मलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाची झोप उडवली होती. या विषाणूमुळे जगातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाले. कोरोनाचे नाव काढले तरी, अनेकांच्या अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक न्यूज अँकर जानेवारी २०२५ मध्ये कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचे ते बोलत आहे. पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात आणि लोकांना पुढील ४० दिवस सावध राहण्याचा सल्ला हा व्हिडिओतून देण्यात आला आहे. मात्र, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जुना असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना अशा अफवांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, १७ डिसेंबर २०२४ ला एका फेसबुक युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘सावध राहा, नवीन वर्ष २०२५ मध्ये पुन्हा कोरोनाचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे, चीनमध्ये कोरोनामुळे दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे.’ हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर विश्वास ठेवला आहे.
फॅक्ट चेक टीमने गुगलवर कीवर्ड सर्चचा वापर करून तपास केला. या दाव्याला कोणत्याही विश्वसनीय सूत्राकडून दुजोरा मिळू शकला नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटची तपासणी केली असता असे दिसून आले की, भारतात सध्या केवळ ११ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तसेच मंत्रालयाच्या वेबसाईटवर चौथ्या लाटेबाबत किंवा रुग्णवाढीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या न्यूज अँकर सय्यद सुहैल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ही क्लिप २०२२ मधील असल्याची माहिती त्यांनी दिली. ही माहिती २०२२ मधील अहवालांवर आधारित आहे. अलीकडे असे कोणतेही अपडेट आलेले नाही. बी.आर. आंबेडकर बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे (एसीबीआर) संचालक प्रोफेसर सुनीत कुमार सिंह यांनी सांगितले की, २०२५ मध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. २०२४ प्रमाणे २०२५ मध्येही परिस्थिती सामन्य राहील.
निकष: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ २०२२ मधील आहे आणि खोट्या दाव्यासह शेअर करण्यात आला आहे. २०२५ मध्ये कोरोनाची चौथी लाट येईल, हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
संबंधित बातम्या