Fact Check : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या रंगावर टिप्पणी करत त्यांना आफ्रिकन म्हटले का ? वाचा सत्य-fact check edited video viral as a pm modi commenting on president murmus complexion he compared him to africans ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या रंगावर टिप्पणी करत त्यांना आफ्रिकन म्हटले का ? वाचा सत्य

Fact Check : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या रंगावर टिप्पणी करत त्यांना आफ्रिकन म्हटले का ? वाचा सत्य

Fact Crescendo HT Marathi
May 31, 2024 03:52 PM IST

PM Modi On Droupadi Murmu : व्हायरल व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, राष्ट्रपतींच्या त्वचेचा रंग काळा असल्याने त्या आफ्रिकेतील वाटतात आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाला पाहिजे. याची पडताळणी केली असता हा व्हिडिओ एडिटेड असल्याचे समोर आले.

मोदींनी राष्ट्रपतींची तुलना आफ्रिकन लोकांशी केली.
मोदींनी राष्ट्रपतींची तुलना आफ्रिकन लोकांशी केली.

लोकसभा निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या वक्तव्याचे एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते सर्व आफ्रिकेतील असतात. द्रौपदी मुर्मू सुद्धा आफ्रिकन आहे आणि त्यामुळे तिच्या त्वचेचा रंग काळा आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला पाहिजे.

व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर समजले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.

काय आहे व्हिडिओमधील दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी एका प्रचार सभेमध्ये म्हणतात की, राष्ट्रपतींच्या त्वचेचा रंग काळा असल्याने त्या आफ्रिकेतील वाटतात आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाला पाहिजे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भारतात ज्यांचा रंग काळा आहे, त्यांनी ४ जूनच्या आधी त्यांचा रंग गोरा करावा. कारण नरेंद्र मोदींनी भारतात जे काळे आहेत त्यांना आफ्रिकन म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी तर आपल्या देशाच्या राष्ट्रपतींसाठी असे म्हटले आहे.

मूळ पोस्ट –ट्विट|आर्काइव्ह

 

व्हायरल व्हिडिओची तथ्य पडताळणी -

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, नरेंद्र मोदी ८ मे रोजी तेलंगणातील वारंगलमधील सभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे.

भाजपने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवरून या भाषणाचा व्हिडिओ थेट प्रक्षेपित केला होता.

पंतप्रधान मोदींचे संपूर्ण भाषण पाहिल्यावर लक्षात येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींवर टिप्पणी करत नव्हते. ते राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यावर टीका करत होते.

नरेंद्र मोदी आपल्या भाषणाच्या ४३:५० व्या मिनिटावर म्हणतात की, आज मला कळले की, राजकुमार (राहुल गांधींचे) काका (सॅम पित्रोदा) अमेरिकेत राहतात. राजकुमार काका त्यांचे तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहेत आणि आजकाल क्रिकेटमधील तिसरे पंच आहेत. जर काही गोंधळ असेल तर ते थर्ड अंपायरला विचारतात, त्याचप्रमाणे जर राजकुमार गोंधळला असेल तर ते सल्ला घेतात.

पुढे ते सांगतात की, या राजपुत्राच्या तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक काकांनी एक मोठं रहस्य उघड केलं आहे. ते म्हणतात की, ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते सर्व आफ्रिकेतील आहेत. याचा अर्थ त्यांनी त्वचेच्या रंगाच्या आधारे तुम्हा सर्वांना आणि माझ्या देशातील अनेक लोकांना अपमानीत केले. तेव्हाच मला समजले की त्वचेचा रंग पाहून त्यांनी असे गृहीत धरले की द्रौपदी मुर्मू देखील आफ्रिकन आहे आणि म्हणून जर तिच्या त्वचेचा रंग काळा असेल तर त्यांचा पराभव केला पाहिजे.

एनडीटीव्हीने व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित विधान अहवालात नमूद करण्यात आला आहे. बातमीच्या शीर्षकमध्ये लिहिले होते की, राजकुमारचे काका अमेरिकेत… पंतप्रधान मोदींनी सॅम पित्रोदा यांच्या ‘काळ्या कातडी’च्या विधानाने राहुलची कोंडी केली.”

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य व्हायरल होत आहे.

सॅम पित्रोदा 

सॅम पित्रोदा एका मुलाखतीत म्हणतात की, “भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक बहुधा गोरे दिसतात आणि दक्षिण भारतातील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. असे असूनही काही फरक पडत नाही. आपण सर्व भाऊ-बहिणी आहोत.”

व्हायरल व्हिडिओतील निष्कर्ष -

व्हिडिओची पडताळणी केल्यावर  सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.  मुळात सॅम पित्रोदा यांनी दक्षिण भारतातील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करत होते.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Fact Crescendo ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)