Government scheme: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, या सरकारी योजनेंतर्गत मुलींना आर्थिक मदत मिळेल आहेत, असा दावा करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होतील, असेही सांगितले जात आहे. मात्र, पीआयबीने यामागील सत्यता तपासून हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कले.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सरकारने मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा करण्याची योजना आखली आहे. ८ ते २२ वयोगटातील मुलींचे पालक हा फॉर्म भरू शकतात. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा योजनेच्या नावाखाली व्हायरल होत असलेल्या या फॉर्ममध्ये अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, फोटो, बँक खाते क्रमांक यासह अनेक माहिती मागविण्यात आली आहे.
पीआयबीने शनिवारी, २३ नोव्हेंबरच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फॉर्म बनावट आहे. पीआयबीने म्हटले आहे की, अशा कोणत्याही फॉर्मचे वितरण बेकायदेशीर आहे आणि या योजनेअंतर्गत कुठल्याही मुलींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्यासह संपूर्ण देशभरात मुलींच्या जन्मदराचे म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर प्रमाण १९६१ मध्ये असलेल्या प्रमाणापेक्षा दिवसेंदिवस कमी झाले. जन्मदराच्या समस्येत तोंड देण्यासाठी सरकारने मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ही योजना ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरू केली. या योजनेचा शुभारंभ हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी झाला. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते, लाडली लक्ष्मी, मुलींसाठी शाळेचा शुल्क माफ, मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत प्राधान्य, 'सर्वांना घर' योजनेच्या अंतर्गत अनुदान, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत विनामूल्य एलपीजी जोडणी आणि अन्य अशा विविध योजना राबविल्या जातात. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा योजना मुलींच्या जन्मापूर्वी आणि नंतर त्यांच्या सुरक्षेला मदत करते. या योजनेंतर्गत मुलीच्या मुलींच्या जन्मदरात काहीशी वाढ झाली.