पाकिस्तान बरोबरच चीनलाही घाम फोडणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किती खतरनाक? काय आहे या संघटनेची मागणी?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तान बरोबरच चीनलाही घाम फोडणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किती खतरनाक? काय आहे या संघटनेची मागणी?

पाकिस्तान बरोबरच चीनलाही घाम फोडणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किती खतरनाक? काय आहे या संघटनेची मागणी?

Nov 10, 2024 06:05 PM IST

what is balochistan liberation army : पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

कोण आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ? ज्यांच्यामुळे पाकिस्तानच्या लष्करासह चीनही दहशतीत, काय आहे त्यांची मागणी, वाचा!
कोण आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ? ज्यांच्यामुळे पाकिस्तानच्या लष्करासह चीनही दहशतीत, काय आहे त्यांची मागणी, वाचा!

what is balochistan liberation army : पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जण ठार तर ४६ जण जखमी झाले आहेत. प्रांतीय राजधानी क्वेटा येथील रेल्वे स्थानकावर पेशावरला जाणारी  जाफर एक्स्प्रेस सुटण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर प्रवासी जमले असताना हा स्फोट झाला. बलोच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान लष्कराने पाकिस्तानवर अशाप्रकारे हल्ला करण्याचे  ही पहिलीच वेळ नाही. हा बंडखोर गट पाकिस्तानात अनेक वेळा हल्ले केले आहे. ही संघटना नेमकी काय आहे? त्यांच्या मागण्या काय आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं!

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ही पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात कार्यरत असलेली प्रमुख बंडखोर संघटना आहे. बलुचिस्तान खनिज संपत्तीने समृद्ध असलेला पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि श्रीमंत प्रांत आहे. परंतु तेथील रहिवाशांचा आरोप आहे की त्यांना येथे असणाऱ्या संसाधनांचा लाभ मिळत नाही. त्यांच्या या संपत्तीची लूट पाकिस्तानी लष्कर आणि चीन करत आहे. त्यामुळेच बीएलए आणि इतर बलुच संघटनांनी पाकिस्तान सरकारविरोधात स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे.  या गटाची एकच मुख्य मागणी आहे. बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे जेणेकरून बलुच लोकांचा तेथील संसाधनांवर हक्क प्रस्थापित करता येईल.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना कशी आणि कोणी केली?

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची (बीएलए) स्थापना बलुचिस्तानमधील लोकांच्या हक्कासाठी  आणि त्यांच्या लढण्यासाठी  करण्यात आली. या संघटनेचे मूळ बलुचिस्तानच्या ऐतिहासिक संघर्षात आहे जे पाकिस्तानपासून आपले स्वातंत्र्य आणि ओळख टिकवून ठेवण्यासाठी दीर्घकाळा पासून लढा देत आहेत. 

बीएलएची  निर्मिती

बीएलएची स्थापना १९७०  च्या दशकात झाली असे मानले जाते, जेव्हा बलुचिस्तानचे लोक आपली राजकीय आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी संघर्ष करत होते. १९७० च्या दशकात पाकिस्तानाने  मोठी लष्करी मोहीम हाती घेत अनेक बलुच नेते आणि नागरिकांचा  छळ करत त्यांची हत्या केली.  या काळात अनेक बलुच गटांनी सशस्त्र उठावाचा मार्ग निवडला. मात्र, प्रत्यक्षात २००० साली या संघटनेचा विस्तार वाढला.  

बलुच नेते मीर हाबत खान मारी आणि त्यांचे पुत्र नवाब खैर बख्श मारी यांनी बीएलएची स्थापना केली होती. नवाब खैर बख्श मारी यांनी बलुच लोकांचे हक्क आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय आणि इतर बलुच नेत्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले. मात्र, याचा कोणताही अधिकृत पुरावा मिळालेला नाही.

सध्याचे नेतृत्व

बीएलएचे बलुचिस्तानमध्ये अनेक गट सक्रिय आहेत. यातील काही गट वेगळ्या पद्धतीने काम करत असून बीएलए व्यतिरिक्त अन्य संघटनाही उदयास आल्या आहेत. गेली अनेक वर्षे बीएलएचे नेतृत्व बलाच मारी आणि ब्रह्मदाग बुगती यांच्यासारख्या नेत्यांनी केले आहे, ज्यांनी या चळवळीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. सध्या अस्लान बलोच हे बीएलएचे नेते असल्याचं बोललं जातं. बीएलएचा विश्वास आहे की पाकिस्तानच्या सरकारने आणि लष्कराने बलुच लोकांचे शोषण केले आहे आणि त्यांच्या संसाधनांचे शोषण केलं आहे.

आझादी - बीएलएला बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करून स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित करायचे आहे.

संसाधनांवर नियंत्रण – बलुचिस्तानच्या संसाधनांचा वापर केवळ देशभक्त जनतेच्या हितासाठीच व्हावा आणि त्यांच्यावर फक्त बलुच नागरिकांचाच अधिकार असावा, असे त्यांचे मत आहे.

मानवी हक्कांच्या उल्लंघनाला विरोध :  बीएलएचे म्हणणे आहे की पाकिस्तानी सैन्याने बलुच लोकांवर अत्याचार केले आहेत, ज्यात कोठडीतील छळ, बेपत्ता होणे आणि बळजबरीने दडपशाहीचा समावेश आहे.

चीन आणि पाकिस्तानसोबत तणाव

बीएलएचा प्रमुख विरोध चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला (सीपीईसी) आहे. सीपीईसीमध्ये ग्वादर बंदराचा विकास करण्यात येत आहे.  या प्रकल्पाला  बीएलए "बलुचिस्तानच्या लोकांचे शोषण" करणारा प्रकल्प मानतो.  चीनमधील अनेक प्रकल्पांवर बीएलएने  हल्ले आहेत. त्यात प्रामुख्याने  चिनी अभियंते आणि कामगार ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे  चीन आणि पाकिस्तान दोघेही चिंतेत असून या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी चीनचा पाकिस्तानवर दबाव वाढत आहे.

बीएलएचे भारताशी संबंध आहेत का?

बीएलएला भारताकडून पाठिंबा मिळत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे, पण भारताने नेहमीच असे आरोप फेटाळून लावले आहेत. भारताला बीएलएला निधी, प्रशिक्षण आणि पाठिंबा देऊन पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे, असे पाकिस्तानचे मत आहे. मात्र, पाकिस्तानमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या घटनांकडेच लक्ष वेधत असून बीएलएशी आपला काहीही संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. या आरोपांनंतरही भारत आणि बीएलए यांच्यातील संबंधांना पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. उलट बलुचिस्तानातील लोकांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे अनेक पुरावे भारताने सादर केले आहेत.

आंतरराष्ट्रीय समुदायाने बीएलएच्या दहशतवादी कारवायांचा निषेध केला असून त्याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. मात्र, बलुच स्वातंत्र्याच्या मागणीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही करण्यात आला असून मानवाधिकार संघटनांनी पाकिस्तानला हा प्रश्न शांततेने सोडविण्याचे आवाहन केले आहे. बीएलएचा उदय आणि पाकिस्तानातील त्याच्या कारवाया ही केवळ बंडखोर चळवळ नाही; प्रादेशिक राजकारण, मानवी हक्क आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा लढा हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर