
Haryana Assembly Elections 2024 : एकवेळ हवामानाचा अचूक अंदाज बांधता येईल, पण राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणालाही बांधता येणार नाही. विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या हरयाणात याची प्रचिती आली आहे. अवघ्या दोन तासाभरापूर्वी जाहीर सभेत भाजपसाठी मतं मागणाऱ्या एक नेत्यानं दोन तासांतच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या वेगवान पक्षांतराची सध्या देशभरात चर्चा आहे.
अशोक तन्वर असं या नेत्याचंं नाव आहे. तन्वर हे हरयाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार आहेत. राहुल गांधी यांची जिंदमध्ये सभा सुरू असताना तन्वर थेट व्यासपीठावर पोहोचले आणि त्यांनी राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्याचवेळी तन्वर हे स्वगृही परतल्याची घोषणा करण्यात आली. तन्वर यांच्या या नाट्यमय प्रवेशाचा व्हिडिओ काँग्रेसनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हरियाणा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक तन्वर यांचा समावेश होता. भाजपनं त्यांना प्रचार समितीचं सदस्यपदही दिलं होतं. राहुल गांधी काँग्रेसच्या सभेला पोहोचेपर्यंत तन्वर हे भाजप उमेदवारांचा प्रचार करत होते. ते जिंदच्या सफिदो विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामकुमार गौतम यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत सहभागी झाले होते. त्यानंतर अचानक त्यांनी पक्ष बदलला. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी तासभर आधीच त्यांनी एक्स हँडलवरून भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेची छायाचित्रे पोस्ट केली होती.
अशोक तन्वर यांनी नलवा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणधीर पानिहार यांच्या समर्थनार्थ एका दिवसापूर्वी काढलेल्या रॅलीची छायाचित्रे पोस्ट करून विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भाजपचं सरकार स्थापन होईल, असा दावाही त्यांनी केला होता.
अशोक तन्वर हे माजी खासदार आहेत. ते हरियाणा काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. तन्वर यांनी २०१९ मध्ये काँग्रेस सोडली होती. काँग्रेस सोडल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षानं तन्वर यांना निवडणूक प्रचार समितीचं अध्यक्ष बनवलं होतं. मात्र, निवडणुकीपूर्वीच तन्वर यांनी आम आदमी पक्षाला जोरदार धक्का देत मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक तन्वर हे लोकसभा निवडणुकीत सिरसा मतदारसंघातून कुमारी सेलजा यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार होते. आम आदमी पक्षाप्रमाणेच त्यांनी आता भाजपलाही धक्का दिला आहे.
संबंधित बातम्या
