Vaibha Kale killed in Gaza : गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल व पॅलेस्टिनमधील हमास या संघटनेत पेटलेलं युद्ध अद्याप सुरूच आहे. भारताच्या दृष्टीनं तिथून दु:खद बातमी आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध मोहिमांसाठी काम करणारे भारतीय लष्करातील निवृत्त जवान वैभव अनिल काळे यांना गाझामध्ये वीरमरण आलं आहे. राफा प्रदेशातून खान युनूस भागातील हॉस्पिटलमध्ये वाहनातून प्रवास करताना त्यांचा मृत्यू झाला.
संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी सोमवारी रात्री एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. वैभव काळे हे निवृत्त भारतीय जवान होते. भारतीय लष्करातून कर्नल पदावरून ते निवृत्त झाले होते. भारतीय लष्करात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात सियाचिन ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेचा भाग म्हणून काँगोमध्ये ते आघाडीवर होते. ईशान्य भारतातही त्यांनी सेवा बजावली होती. पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्याच्या वेळी त्यांनी एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं.
निवृत्तीनंतर वैभव काळे हे एक महिन्यापूर्वी यूएनमध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू झाले. ते युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटी (DSS) चे कर्मचारी सदस्य होते. रुजू झाल्यानंतर ते गाझामध्ये सक्रिय झाले. तिथं नागरिकांना मदत करताना त्यांना वीरमरण आलं. काळे हे ४६ वर्षांचे होते.
वैभव काळे ज्या वाहनात युनोच्या कर्मचाऱ्यांसोबत प्रवास करत होते, त्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केला. हा गोळीबार कोणी केला याची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीयाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्रायली संरक्षण दलानं (IDF) या गोळीबाराची आणि वैभव काळे यांच्या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे.
वैभव काळे हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचं बालपण नागपुरात गेलं. मात्र नंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटी (DSS) कर्मचारी सदस्याचा मृत्यू झाल्याबद्दल आणि एका कर्मचाऱ्याला झालेल्या दुखापतीबद्दल यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. गाझातील संघर्षामुळं केवळ तिथले सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर मानवतावादी काम करणाऱ्या सैनिकांनाही जीव गमवावा लागत आहे. दोन्ही बाजूंकडून तात्काळ युद्धविराम करून ओलिसांची सुटका केली जावी, असं आवाहन युनोच्या महासचिवांनी निवेदनाद्वारे केलं आहे.
युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीचे अंडर-सेक्रेटरी-जनरल गिल्स मिचॉड यांनी कर्नल काळे यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. गाझा पट्टी सारख्या जगातील काही सर्वात धोकादायक भागांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात त्यांनी मोलाची मदत केली. समर्पित भावनेनं ते कार्यरत होते. त्यांनी नेहमीच त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रभाव टाकला, असं मिचॉड यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या