बांगलादेश जळत असताना ब्रिटनमध्येही उसळला हिंसाचार, भारतीयांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क, मार्गदर्शक सूचना जारी-exercise due caution india alerts travellers to uk amid riots ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बांगलादेश जळत असताना ब्रिटनमध्येही उसळला हिंसाचार, भारतीयांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क, मार्गदर्शक सूचना जारी

बांगलादेश जळत असताना ब्रिटनमध्येही उसळला हिंसाचार, भारतीयांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क, मार्गदर्शक सूचना जारी

Aug 06, 2024 05:56 PM IST

UK riots : ब्रिटनमध्येही हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे लंडनमधील नागरिकांसाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आंदोलकांनी स्थलांतरितांवर, विशेषत: मुस्लिमांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारकडून लंडनमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
केंद्र सरकारकडून लंडनमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी (REUTERS)

भारताच्या शेजारील बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा त्याग केल्यानंतरही आंदोलन शमलेले नाही.  बांगलादेशची सत्ता लष्काराच्या मुठीत गेली असून तेथील हिंदू अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. बांगलादेशात तणाव असताना दुसरीकडं ब्रिटनमध्येही हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे लंडनमधील नागरिकांसाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने मंगळवारी भारतीय प्रवाशांना ब्रिटनमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ब्रिटनमध्ये गेल्या दशक भरातील सर्वात भीषण दंगलीनंतर हिंसक आंदोलकांनी स्थलांतरितांवर, विशेषत: मुस्लिमांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय प्रवाशांनी स्थानिक बातम्यांशी जुळवून घ्यावे आणि ज्या ठिकाणी निदर्शने होत आहेत ते टाळावे, असे उच्चायुक्तालयाने ट्रॅव्हल अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतातून येणाऱ्या पर्यटकांना ब्रिटनमध्ये प्रवास करताना सतर्क राहण्याचा आणि योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.

ब्रिटनच्या शहरांमध्ये दंगली कशामुळे झाल्या?

गेल्या आठवड्यात साऊथपोर्टमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर झालेल्या चाकूहल्ल्याचे गैरफायदा स्थलांतरित आणि मुस्लीम विरोधी गटांनी घेतले आहे. चुकीची माहिती ऑनलाइन पसरवली जात आहे आणि उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींकडून पसरवली जात आहे, ज्यामुळे विविध शहरांमध्ये अशांतता पसरली आहे.

साऊथपोर्टमधील एक संशयित कट्टर इस्लामी असल्याचा दावा केल्यानंतर गेल्या मंगळवारी ही अशांतता सुरू झाली. मात्र, ब्रिटनमध्ये जन्मलेल्या या १७ वर्षीय संशयिताला दहशतवादी धोका मानले जात नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संशयिताचे आई-वडील रवांडाहून स्थलांतरित झाले होते.

मुस्लीम समुदायांना लक्ष्य करणाऱ्यांना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी ग्वाही ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिली.स्पष्ट प्रेरणा काहीही असो, हा निषेध नाही, हा निव्वळ हिंसाचार आहे आणि आम्ही मशिदी किंवा आमच्या मुस्लिम समुदायांवरील हल्ले खपवून घेणार नाही," स्टार्मर यांनी सोमवारी सांगितले.

 ब्रिटनचे गृहमंत्री यवेट कूपर यांनी हिंसाचारावर टीका केली आणि म्हटले की, यामुळे वांशिक द्वेष वाढला आहे आणि स्थलांतरितांच्या चिंतेवर ही अतिप्रतिक्रिया आहे. त्यांनी पोलिसांवरील हल्ल्यांचा निषेध केला आणि दंगल अन्यायकारक असल्याचे म्हटले.

निदर्शनांमध्ये काहीशे लोक सहभागी झाले आहेत, ज्यामुळे लूटमार, मशिदींवर हल्ले आणि वांशिक अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार झाला आहे. गाड्यांना आग लावण्यात आली असून काही सोशल मीडिया व्हिडिओमध्ये हिंसक घटना दाखवण्यात आल्या आहेत. दंगल सुरू झाल्यापासून ब्रिटन पोलिसांनी ३७८ जणांना अटक केली आहे.

विभाग