मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharat Jodo : जम्मू काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री भारत जोडो यात्रेत सहभागी होणार; पदयात्रा करणार

Bharat Jodo : जम्मू काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री भारत जोडो यात्रेत सहभागी होणार; पदयात्रा करणार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 28, 2022 09:45 AM IST

Bharat Jodo Yatra : येत्या २२ जानेवारीला कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मिरमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी राज्यातील सर्व दिग्गज नेते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Bharat Jodo Yatra In Jammu and Kashmir
Bharat Jodo Yatra In Jammu and Kashmir (PTI)

Bharat Jodo Yatra In Jammu and Kashmir : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा अनेक राज्यांचा प्रवास करत सध्या दिल्लीतून पंजाबच्या दिशेनं निघाली आहे. पुढील एक महिना प्रवास करत ही यात्रा येत्या २२ जानेवारीला जम्मू-काश्मिरमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर या ३० जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. परंतु आता भारत जोडो यात्रा काश्मिरमध्ये पोहचल्यानंतर त्यात केंद्रशासित प्रदेशातील तीन बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेते कमल हासन यांनी दिल्लीत भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता जम्मू-काश्मिचे तब्बल तीन माजी मुख्यमंत्री भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि खासदार रजनी पाटील यांनी काश्मिर दौरा केला आहे. त्यानंतर श्रीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, मला सांगायला आनंद होत आहे की, जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती हे तिन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. दोन्ही केंद्राशासित प्रदेशातील यात्रेच्या समारोपालाही तिन्ही नेते हजर राहणार आहेत. हा काँग्रेस पक्षासाठी आनंदाचा क्षण असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. याशिवाय काँग्रेसच्या शिष्टमंडळानं जम्मूमध्ये एलजी मनोज सिन्हा यांची भेट घेऊन आगामी भारत जोडो दौऱ्याबाबत चर्चा केली आहे.

त्यानंतर पदयात्रेला सरकारकडून सहकार्य मिळणार असल्याचा दावा केसी वेणुगोपाल यांनी केला आहे. काश्मिरमधील जनता भारत जोडो यात्रेची आतुरतेनं वाट पाहत आहे. इतर राज्यांची ज्या प्रमाणे मोठ्या उत्साहानं राहुल गांधींचं स्वागत केलं तशाच जल्लोषात काश्मिरमध्ये भारत जोडो यात्रेचं स्वागत केलं जाईल, काश्मिर आणि काँग्रेसचं नातं हे स्वातंत्र्यापासून आहे, त्यामुळं येथील लोकांना काँग्रेसविषयी आत्मियता वाटत असल्याचं केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point