Chandrababu Naidu Arrested : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे सीआयडीच्या विशेष पथकाने नायडू यांना नंदयाला जिल्ह्यातून अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये घोटाळा केल्याच्या आरोपावरून सीआयडीने ही कारवाई केली आहे. त्यामुळं आता चंद्राबाबू नायडू यांची घोटाळा प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे. सीआयडीने चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश यालाही गोदावरी जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता यावरून इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीएच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील स्किल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशनमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यामुळं सीआयडीने चंद्राबाबू आणि त्यांचा मुलगा लोकेश याला अटक केली असून दोघांची चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. २०२१ साली याच प्रकरणात नायडू पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सीआयडीने कडक कारवाई करत नांदयाल येथून पहाटे तीन वाजेच्या सुमारास चंद्राबाबू नायडू यांना अटक केली आहे. याशिवाय गोदावरी जिल्ह्यातून त्यांचा मुलगा लोकेश यालाही अटक करण्यात आली आहे. आंध्राचे डीआयजी रघुरामी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहे. तसेच तेलगू देशम पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्राबाबू यांनी राज्याचा दौरा सुरू केला होता. परंतु पूर्वीच्या भ्रष्टाचार प्रकरणात सीआयडीने नायडू पितापुत्रांना अटक केल्यानं आंध्रप्रदेशच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळं आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यातील राजकीय वैर जगजाहीर आहे. त्यातच आता चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
सीआयडीने अटक केल्यानंतर बोलताना चंद्राबाबू म्हणाले की, गेली ४५ वर्षे मी निस्वार्थपणे तेलुगू लोकांची सेवा केली आहे. तेलुगू लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यास तयार आहे. तेलुगू लोकांची, आंध्र प्रदेश आणि माझ्या मातृभूमीची सेवा करण्यापासून पृथ्वीवरील कोणतीही शक्ती मला रोखू शकत नसल्याचं चंद्राबाबू यांनी म्हटलं आहे.