Karnataka Sex Scandal News : अत्यंत गुंतागुंतीची प्रकरणे आणि मोठमोठ्या घोटाळ्यांचा तपास शिताफीनं करणारी कर्नाटकची सीआयडी सध्या वेगवेगळ्या सेक्स स्कँडलच्या तपासात अडकली आहे. राज्यातील तीन वेगवेगळ्या सेक्स स्कँडल्सचा तपास सध्या सीआयडीचे अधिकारी करत आहेत. या तपासाचा भाग म्हणून कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींमुळं सीआयडीचे अधिकारीही वैतागून गेले आहेत.
कर्नाटक सीआयडी करत असलेल्या प्रकरणाच्या तपासात व्हीआयपी लोक आरोपी आहेत. या प्रकरणांमध्ये प्रज्वल रेवन्ना सेक्स टेप घोटाळा, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या विरुद्धचा POCSO खटला आणि विधान परिषद आमदार सूरज रेवन्ना यांच्यावर एका पुरुष कर्मचाऱ्यानं केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचा समावेश आहे.
सरकारनं प्रज्वल रेवण्णाशी संबंधित प्रकरण तपासासाठी सीआयडीकडं सोपवले आहे. या प्रकरणात काही पेन ड्राईव्हचाही समावेश होता. यात हासन परिसरात व्हायरल होत असलेले सेक्स व्हिडिओ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आसपास हे प्रकरण उघडकीस आलं होतं. देशभरात त्याची चर्चा झाली. सध्या सीआयडी या प्रकरणात दोन गोष्टी करत आहे. एक म्हणजे सेक्स व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती खरोखरच प्रज्वल रेवण्णा आहे का हे पाहिलं जात आहे. दुसरं म्हणजे, हे पुरावे पीडित महिलांच्या जबाबाशी जुळतायत की नाही हे पाहिलं जात आहे. त्यासाठी ताब्यात असलेल्या व्हिडिओ क्लिप पाहाव्या लागत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका अधिकाऱ्यानं त्यांची झालेली कठीण परिस्थिती सांगितली. ‘तपास करताना जी काही संवेदनशील माहिती मिळाली, ती आपल्याच अधिकाऱ्यांना सांगणंही काहीसं कठीण गेलं. असं वाटत होतं की आम्ही आर-रेट केलेल्या चित्रपटांच्या मॅरेथॉनमध्ये अडकलो आहोत.’
'पीडितांचे जबाब नोंदवताना आम्हाला हे व्हिडिओ आणि फोटो त्यांना दाखवावे लागतात. हे खूपच कठीण आणि अवघडून टाकणारं आहे, असं या अधिकाऱ्यानं मीडियाशी बोलताना सांगितलं. हासन सेक्स टेप कांडातील आरोपी प्रज्वल रेवण्णा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे.
'आता एमएलसी सूरज रेवन्ना यांचं प्रकरण आमच्यासमोर आलं आहे. यात जेडीएसच्या एका पुरुष कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. सध्या हे प्रकरण ऑडिओ आणि व्हॉट्सॲप चॅटपुरतं मर्यादित आहे. येत्या काही दिवसांत आणखी काय पुढं येईल यांची कल्पना नाही. वाल्मिकी कॉर्पोरेशनच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचीही सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे.
संबंधित बातम्या