मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  EPFO News : मोठी बातमी! जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारणार नाही; भविष्य निर्वाह निधी संघटनेची भूमिका

EPFO News : मोठी बातमी! जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारणार नाही; भविष्य निर्वाह निधी संघटनेची भूमिका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 18, 2024 12:34 PM IST

EPFO on Aadhaar Card : यूआयडीएआयच्या निर्देशानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं यापुढं जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारलं जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

Aadhaar Card
Aadhaar Card

EPFO on Aadhaar Card : जन्मतारखेचा पुरावा म्हणून यापुढं आधार कार्डचा पुरावा देण्याची गरज नाही, असं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) स्पष्ट केलं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) सूचनेनंतर ईपीएफओनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम ईपीएफओच्या सुमारे ७ कोटी सदस्यांवर होणार आहे.

देशातील बहुतेक नागरिकांकडून जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारचा वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी तो स्वीकारला देखील जात आहे, असं यूआयडीएआयच्या निदर्शनास आलं आहे. आधार कायदा २०१६ नुसार आधार हे युनिक आयडेंटिफायर असले तरी जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्यता देण्यात आली नव्हती. आधार हे केवळ खरी ओळख पटवण्याचं साधन आहे. जन्माचा पुरावा नाही, हे यूआयडीएआयनं अधोरेखित केलं आहे. 

Tata Punch EV : टाटाची ‘पंच’ इलेक्ट्रिक कार अखेर बाजारात, किंमत मध्यमवर्गीयांना परवडेल अशी

यूआयडीएआयच्या या निर्देशानंतर ईपीएफओनं जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी स्वीकारण्यात येणाऱ्या कागदोपत्री पुराव्यांच्या यादीतून आधार काढून टाकलं आहे. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या (CPFC) मान्यतेनं हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, नव्या बदलांच्या कार्यवाहीसाठी अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश अंतर्गत प्रणाली विभागाला (आयएसडी) देण्यात आले होते.

ईपीएफओनं जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार काढून टाकणं यूआयडीएआयच्या निर्देशांशी आणि आधारच्या मर्यादांवरील कायदेशीर भूमिकेशी सुसंगत आहे. ईपीएफओ सदस्य आणि जन्मतारीख दुरुस्तीत गुंतलेल्या संस्थांना या बदलाची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ईपीएफओसाठी आता जन्मतारखेचा वैध पुरावा कोणता?

कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय मंडळाने जारी केलेले गुणपत्रक किंवा विद्यापीठ-शाळा सोडल्याचा दाखला (एसएलसी)

शाळा हस्तांतरण प्रमाणपत्र (टीसी)

एसएससी प्रमाणपत्र ज्यात सेवा नोंदींवर आधारित नाव आणि जन्मतारीख-प्रमाणपत्र आहे

पॅन कार्ड

केंद्रीय / राज्य पेन्शन पेमेंट ऑर्डर

राज्य सरकारनं जारी केलेलं अधिवास प्रमाणपत्र

सिव्हिल सर्जनने सदस्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जारी केलेले व न्यायालयानं प्रतिज्ञापत्रासह प्रमाणित केलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र

WhatsApp channel

विभाग