'आप'चे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक; ईडीचे अधिकारी छापा टाकायला आले आणि चौकशी करून घेऊन गेले!-enforcement directorate arrests aap mla amanatullah khan in alleged waqf board scam ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'आप'चे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक; ईडीचे अधिकारी छापा टाकायला आले आणि चौकशी करून घेऊन गेले!

'आप'चे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक; ईडीचे अधिकारी छापा टाकायला आले आणि चौकशी करून घेऊन गेले!

Sep 02, 2024 12:57 PM IST

Amanatullah Khan arrest : आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार अमानतुल्लाह खान यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) अटक केली आहे.

'आप'चे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक; ईडीचे अधिकारी छापा टाकायला आले आणि...
'आप'चे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक; ईडीचे अधिकारी छापा टाकायला आले आणि...

ED arrested Amanatullah Khan : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावरील संकटे कमी व्हायला तयार नाहीत. कथित मद्य घोटाळ्यात पक्षाच्या मागे चौकशीचा ससेमिरी सुरू असताना व मुख्यमंत्री केजरीवाल स्वत: तुरुंगात असताना आता आमदार अमानतुल्ला खान यांना अटक झाली आहे.

सक्तवसुली संचालनालयानं (ED) आज खान यांना राहत्या घरातून अटक केली. वक्प बोर्ड घोटाळ्याच्या प्रकरणात ही अटक झाल्याचं सांगितलं जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी अमानतुल्लाह खान यांच्या घरावर छापा टाकून त्याची सहा तास चौकशी केली व त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.

काय म्हणाले अमानतुल्लाह खान?

अमानतुल्ला खान यांनी एक्सवरील पोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. 'ईडी'चे लोक मला अटक करण्यासाठी माझ्या ओखला इथल्या घरी आले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तपास यंत्रणा मला सतत त्रास दिला जात आहे. सकाळी सात वाजता  ईडी सर्च वॉरंटच्या नावाखाली मला अटक करण्यासाठी आली आहे. माझ्या सासूबाईंना कॅन्सर आहे आणि त्या सध्या माझ्या घरी आहेत. मी ईडीला पत्र लिहिलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक नोटिशीला उत्तरही दिलं आहे. तरीही हे सगळं सुरू आहे. आमचा आम आदमी पक्ष संपवणं हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही झुकणार नाही आणि खचणारही नाही, असं खान यांनी म्हटलं आहे.

खान यांनी तपासापासून पळ काढला!

दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणातील नियुक्त्या आणि मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीसमोर हजर न राहिल्याबद्दल अलीकडंच ईडीनं खान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. खान यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तपासापासून पळ काढला, असा आरोप ईडीनं केला होता. एक साक्षीदार म्हणून ते ईडीला हवे होते मात्र त्यांच्या वर्तनामुळं ते स्वत:च आरोपी ठरले आहेत, असं ईडीचं म्हणणं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

१०० कोटी रुपयांची वक्फ प्रॉपर्टी बेकायदेशीररित्या भाडेतत्त्वावर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. खान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली वक्फ बोर्डावर ३२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा ही आरोप आहे. या प्रकरणी चार आरोपी आणि एका कंपनीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

विभाग