Arun Kumar Sharma Death: छत्तीसगडचे प्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अरुणकुमार शर्मा यांचे आज (गुरुवार, २९ फेब्रुवारी) निधन झाले. छत्तीसगड सरकारचे ते पुरातत्व सल्लागारही होते. शर्मा यांचे चिरंजीव मनीष शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांच्या वडिलांचे आज पहाटे राजधानी रायपूर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर हिंदू मंदिराच्या अस्तित्वाच्या समर्थनार्थ राज्यातील प्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ अरुणकुमार शर्मा यांनी पुरातत्त्वीय पुरावे गोळा केले होते. अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील सुनावणीदरम्यान गोळा केलेले पुरावे आधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले.
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले त्यांचे वडील १९५९ मध्ये भारतीय पुरातत्व विभागात रुजू झाले होते आणि विविध पदांवर सेवा बजावल्यानंतर १९९२ मध्ये ते अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले. छत्तीसगडमध्ये सेवेत असताना अरुणकुमार शर्मा यांनी सिरपूर, तारीघाट, सिरकट्टी, आरंग, तळा, मल्हार अशा अनेक ठिकाणी उत्खनन केले होते.
निवृत्तीनंतरही त्यांनी सिरपूर (छत्तीसगड) आणि मानसर (महाराष्ट्र) येथील पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननात एएसआयला मदत केली. एएसआयमधील सेवेदरम्यान त्यांनी संपूर्ण भारतात, विशेषत: गुजरात, राजस्थान, हरियाणा, जम्मू, महाराष्ट्र, लक्षद्वीप, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड मधील पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले आणि त्यांच्याविषयी अहवाल प्रकाशित केले.
त्यांनी पुरातत्त्वशास्त्रावर ३५ पुस्तके प्रकाशित केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात बाबरी मशीद-रामजन्मभूमी अयोध्या खटल्याची सुनावणी सुरू असताना अरुण कुमार शर्मा हे या खटल्याचे प्रमुख साक्षीदार होते. प्रभू रामाचे मंदिर आहे आणि मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली आहे, हे त्यांनी न्यायालयाच्या समाधानासाठी सिद्ध केले.
२०१६ मध्ये बस्तर भागातील दंतेवाडा जिल्ह्यातील ढोलकल पर्वतावर गणपतीच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर आठवडाभरातच अरुण कुमार शर्मा यांनी आपल्या टीमसह मूर्तीची पुनर्स्थापना केली होती. अरुणकुमार शर्मा यांची २००४ मध्ये राज्य सरकारचे पुरातत्त्व सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आणि ते २०१७-१८ पर्यंत सक्रिय राहिले. २०१७ मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, डॉ. अरुण कुमार शर्मा हे छत्तीसगडच्या भूमीचे सुपुत्र आहेत, ज्यांनी केवळ छत्तीसगडच नव्हे तर देशातील विविध ठिकाणी पुरातत्व सर्वेक्षण आणि उत्खननात महत्त्वपूर्ण योगदान दिले. छत्तीसगडमधील सिरपूर आणि राजिम येथे त्यांनी खोदकाम केले. डॉ. अरुण शर्मा यांचे पुरातत्त्व क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील.
संबंधित बातम्या