PM Narendra Modi: अब्जाधीश एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. एलॉन मस्क यांनी स्वतः पोस्ट लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्सवर अर्थात ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येने १०० दशलक्षचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती आहे. याबाबत एक्स (ट्विटर)चा मालक असलेल्या एलॉन मस्कने एका पोस्ट लिहित म्हटले आहे की, 'सर्वाधिक फॉलो केलेले जागतिक नेते बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन!' मस्कची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आहे. इतकंच नाही तर, लोकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इतर, युजर्सकडूनही पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधीपासूनच जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केले गेलेले नेते आहेत. या यादीत इतर देशांच्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे ३.८१ कोटी फॉलोअर्स आहेत. तर, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे २.१५ कोटी फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, भारतातील आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांसारख्या विरोधी नेत्यांचे अनुक्रमे २.७५ कोटी आणि २.६४ कोटी फॉलोअर्स आहेत. त्यांच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या कित्येक पटीने अधिक आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युट्युब आणि इन्स्टाग्रामवर देखील सक्रिय आहेत. युट्युबवर त्यांचे २.५ कोटी सबस्क्रायबर आहेत. तर, इन्स्टाग्रामवर त्यांचे ९.१ कोटी फॉलोअर्स आहेत. २००९मध्ये ट्विटरवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत या माध्यमातून जनतेशी जोडले गेले आहेत. एक्स असे नामकरण होण्यापूर्वी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव ‘ट्विटर’ असे होते. या बद्दल बोलताना ‘एक्स’ अधिकाऱ्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी कधीच कोणाला अडवले किंवा ब्लॉक केले नाही. एक अधिकारी म्हणाला की, 'नरेंद्र मोदी एक्सवर खूप सक्रिय आहेत, अनेक सामान्य नागरिकांना ते फॉलो करतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्या मेसेजला प्रतिसाद देतात. त्यांनी कधीही कोणालाही ब्लॉक केले नाही.’
टेलर स्विफ्ट (९.५३ कोटी), लेडी गागा (८.३१ कोटी) आणि किम कार्दशियन (७.५२ कोटी) या ग्लोबल आणि लोकप्रिय सेलिब्रिटींपेक्षा पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे. पंतप्रधान मोदींचे सोशल मीडिया फॉलोअर्स जगातील काही लोकप्रिय खेळाडू आणि सेलिब्रिटींपेक्षाही जास्त आहेत. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (६.४१ कोटी) आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियर (६.३६ कोटी) यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांचे जास्त फॉलोअर्स आहेत.
संबंधित बातम्या