नवविवाहित सुनेची फाशी घेऊन आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घराला लावली आग; सासू सासरे ठार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नवविवाहित सुनेची फाशी घेऊन आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घराला लावली आग; सासू सासरे ठार

नवविवाहित सुनेची फाशी घेऊन आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घराला लावली आग; सासू सासरे ठार

Mar 19, 2024 08:30 PM IST

नवविवाहित सुनेचा छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत विवाहित तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या सासू-सासऱ्यांचे घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घराला लावली आग; सासू सासरे ठार
संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घराला लावली आग; सासू सासरे ठार

नवविवाहित तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेने प्रक्षुब्ध झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी सोमवारी रात्री उशिरा सासरच्यांचे घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत मृत तरुणीचे वृद्ध सासरे आणि सासू दोघेही ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मुठीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्ती चौरा परिसरात ही घटना घडली आहे. आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. तत्काळ बचाव कार्य करून कुटुंबातील इतर पाच सदस्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले होते. परंतु आज, मंगळवारी पहाटे या जळालेल्या इमारतीत पोलिसांना आणखी दोन मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या सासरे आणि सासूचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंशिका केसरवानी (वय २४) हिचा विवाह गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रयागराज येथील मुठीगंजच्या सत्ती चौरा भागात राहणारा तरुण अंशु केसरवानी याच्याशी झाला होता. दरम्यान, काल, सोमवारी रात्री अंशु केसरवानी याच्या नातेवाइकांनी अंशिका हिच्या घरच्यांना फोन करून सांगितले की, अंशिकाने दुपारपासून स्वत:ला खोलीत बंद करून घेतले आहे. हे ऐकल्यावर अंशिकाचे नातेवाईक धावत तिच्या सासरच्या घरी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता अंशिका पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली. सासरच्या मंडळींनीच अंशिकाचा खून केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. शिवाय काही नातेवाइकांनी गोंधळ घालत घराची तोडफोड केली होती. यातील काही नातेवाईकांनी घराला बाहेरून कुलूप लावून पेटवून दिल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आग तळमजल्यावरील फर्निचरच्या गोदामापर्यंत पसरली होती. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतून पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. परंतु अंशु केसरवानी याचे वडील राजेंद्र केसरवानी आणि त्याची आई शोभा देवी केसरवानी मात्र सापडल्या नाहीत. अंशू हा त्याच्या आई-वडिलांसोबत पळून गेला होता, असं अंशिकाच्या नातेवाइकांचं म्हणण होतं. मात्र, मंगळवारी पहाटे पोलिसांनी घरात प्रवेश केला असता अंशु केसरवानीच्या आई-वडिलांचे जळालेले मृतदेह त्यांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी अंशिकाच्या नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे.

‘प्रयागराजच्या मुठीगंज भागात एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मिळाली होती. तिचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. रागाच्या भरात महिलेच्या नातेवाइकांनी घराला आग लावली. इमारतीतून पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत महिलेचे सासरे आणि सासूचे मृतदेह आढळून आले.’ अशी माहिती प्रयागराजचे पोलीस उपायुक्त (शहर) दीपक भुकर यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर