eight year boy died due to heart attack in UP: उत्तर प्रदेश येथील फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी एका शाळेत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा खेळता खेळता अचानक पडून मृत्यू झाला. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी रुग्णालयातील शिक्षकांना धारेवर धरले. तर डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा संशय आहे.
हिमायूनपूर येथील रहिवासी धनपाल यांचा ८ वर्षांचा मुलगा चंद्रकांत हा हंस वाहिनी इंटर स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होता. तो शनिवारी शाळेत गेला. दुपारच्या जेवणाच्या वेळी जेवल्यानंतर तो खेळत असताना अचानक जमिनीवर पडला. तो पडताच त्याचे मित्र त्याच्या भोवती जमले. याची माहिती त्यांनी शिक्षकांना दिली. शिक्षकांनी तातडीने घटनास्थळी येत त्याला दवाखान्यात भरती केली. चंद्रकांत याला तातडीने वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याला मृत घोषित केले. या बाबट महिती देतांना शाळेचे प्राचार्य रामबाबू म्हणाले की, मधल्या सुट्टीच्या वेळी जेवल्यानंतर आणि खेळून सर्व मुले ही त्यांच्या वर्गात जात होते. यावेळी चंद्रकांत अचानक खाली पडला. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती समजतात चंद्रकांतच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच ते संतप्त झाले. त्यांनी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. तसेच आरोप-प्रत्यारोप करत राहिले. रुग्णालयात झालेल्या गोंधळामुळे पोलिस देखील घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी कुटुंबियांची समजूत काढून त्यांना शांत केले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. वडील धनपाल यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला कोणताही आजार नव्हता. तो पूर्णपणे निरोगी होता.
वैद्यकीय तपासणीत मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही संपूर्ण घटना शाळेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीओ सिटी हिमांशू गौरव यांनी सांगितले की, धावत असताना मुलाचा खाली पडून मृत्यू झाला. इतर मुलांनीही असेच सांगितले आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
संबंधित बातम्या