Manipur Violence 2023 News Updates : गेल्या अनेक दिवसांपासून मणिपुरमध्ये सुरू असलेला हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यात कुकी आणि मैतैई गटाच्या लोकांनी एकमेकांवर तुफान गोळीबार केला आहे. यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एका गीतकाराचा समावेश असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाल्याने मणिपुरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने तणावग्रस्त जिल्ह्यांमध्ये जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली आहे. तसेच हिंसाचाग्रस्त भागांमधील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपुरच्या बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत कुकी आणि मैतैई गटामध्ये भीषण संघर्ष सुरू होता. खोइरेंटक, खौसाबुंग आणि चिंगफेई या भागांमध्ये दोन्ही गटातकडून तुफान गोळीबार करण्यात आला आहे. त्यात आठ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका कलाकाराचाही समावेश आहे. संपूर्ण हिंसाचारात आतापर्यंत शांत राहिलेल्या खोइरेंटक या भागात गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना समोर येत असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळं आता केंद्र तसेच राज्य सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली जात आहे.
हिंसाचारात आठ लोकांचा मृत्यू झाल्याने इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने मणिपूर बंदची हाक दिली आहे. यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारविरोधात आंदोलन केलं जाणार असून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी कायदेशीर लढा दिला जाणार असल्याचं आयटीएलएफकडून सांगण्यात आलं आहे. गुरुवारी झालेल्या गोळीबारात प्रसिद्ध गीतकार एएस मंगबोई यांची देखील हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या