मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Train Accident : पंजाबमध्ये भरधाव ट्रेन तुटली, आठ डबे एकमेकांपासून वेगळे झाले आणि…
Shan-A-Punjab Train Accident
Shan-A-Punjab Train Accident (HT)

Train Accident : पंजाबमध्ये भरधाव ट्रेन तुटली, आठ डबे एकमेकांपासून वेगळे झाले आणि…

22 March 2023, 14:45 ISTAtik Sikandar Shaikh

Shan E Punjab Train : शान-ए-पंजाब या सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे ट्रेनपासून तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Shan E Punjab Train Accident : पंजाबच्या अमृतसर ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या शान-ए-पंजाब सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे निघाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेपासून आठ डबे अचानक वेगळे झाले, परंतु पायलटने तातडीनं ब्रेक मारत स्थिती नियंत्रणात आणल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. पंजाबच्या दिशेनं निघालेल्या या रेल्वेला हरयाणाच्या पानिपतमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. परंतु मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या अनेक प्रवाशांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर आणि दिल्ली दरम्यान धावणारी शान-ए-पंजाब रेल्वे पानिपत जिल्ह्यातील समालखाच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी अचानक आठ कोच रेल्वेपासून वेगळे झाले. प्रवाशांना सुरुवातील नेमकं काय घडलं, याचा अंदाज आला नाही. परंतु रेल्वे तुटल्याचं समजताच प्रवाशांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. याशिवाय रेल्वे इंजिनवरील दाब कमी झाल्याचं समजताच पायलटने तातडीनं ब्रेक लावत रेल्वे थांबवली. याशिवाय या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्यामुळं तातडीनं बचाव पथक घटनास्थळी पोहचलं. त्यानंतर तुटलेल्या रेल्वेच्या दोन्ही तुकड्यांमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि अभियंत्यांनी प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीनं काही तासांच्या आत रेल्वे पुन्हा जोडली. त्यानंतर सर्व प्रवाशांना रेल्वेत बसवून ट्रेन पुढच्या प्रवासाला निघून गेली. त्यानंतर पंजाब आणि दिल्लीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे.