ED reaches Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. कथित मद्य घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलं आहे. केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून ईडीनं केजरीवाल यांची चौकशी सुरू केली होती. ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी केजरीवालांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी हजर राहणं टाळलं. ईडी राजकीय हेतूनं समन्स पाठवत असून मला अटक करण्याचा त्यांचा प्लान आहे, असा आरोप केजरीवालांनी केला होता.
नुकतंच ईडीनं केजरीवालांना नवव्यांदा समन्स बजावलं होतं. त्या विरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर ईडी झाली असून चौकशीसाठी एक पथक केजरीवालांच्या घरी पोहोचलं आहे. तिथं झाडाझडती सुरू आहे.
अटकेची भीती वाटत असेल तर अटकपूर्व जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात का गेला नाहीत, असा प्रश्न न्यायालयानं केजरीवाल यांना केला. तुम्ही चौकशीला सामोरं जात नाही. कुठलाही कॉल घेत नाही. जोपर्यंत कॉल अटेंड करत नाही, तोपर्यंत तपास यंत्रणेला कोणती माहिती हवी आहे हे तुम्हाला कसं कळणार? ऑक्टोबर महिन्यापासून ईडी तुम्हाला समन्स बजावत आहे. मग तुम्ही आतापर्यंत कारवाईला आव्हान का दिलं नाही? तुम्हाला अटकपूर्व जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्यापासून कोणी रोखलं होतं, असा सवाल खंडपीठानं केला.
दिल्ली सरकारचे २०२१-२२ चे उत्पादन शुल्क धोरण तयार करताना आणि त्याची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात केजरीवाल यांच्या नावाचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी केजरीवाल यांच्या संपर्कात होते. त्यातून आरोपींना बक्कळ फायदा झाला. त्या बदल्यात त्यांनी 'आप'ला मोठा निधी दिला, असा आरोप तपासयंत्रणेनं केला आहे. दिल्ली सरकारमधील एक माजी मंत्री सत्येंद्र जैन हे देखील एका मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.
संबंधित बातम्या