केंद्रीय तपास एजन्सी सक्तवसुली संचलनालय ईडी (ED) ने मोठी कारवाई करत वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांची मालमत्ता जप्त केली आहे. केंद्रीय जांच एजन्सी ईडीने PMLA नुसार काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुइस आणि अन्य आरोपींची ४५.९२ लाख किमतीची संपत्ती जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ईडीच्या पथकाने यूपीमधील फरुखाबाद येथे २९.५१ लाख रुपये आणि ४ बँक खात्यात असलेली १६.४१ लाखाची संपत्ती जप्त केली आहे. हे संपूर्ण प्रकरण डॉक्टर झाकिर हुसेन मेमोरियल ट्रस्टमधील घोटाळ्याशी संबंधित आहे. ट्रस्टमधील पैसे वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यूपी पोलिसांनी लुइस खुर्शीद यांच्यासह अन्य आरोपींविरोधात १७ प्रकरणात चार्जशीट दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण टेकओव्हर करत ED ने PMLA नुसार खटला दाखल करून तपास सुरू केला होता.
डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टद्वारे २००९-२०१० या वर्षात जवळपास १७ शिबिरे आयोजित करून अपंगांना कृत्रिम अवयवांचे उपकरण वाटप केली होती. यामध्ये फसवणूक केल्याचा आरोप होता. हे आरोप २०१७ मध्ये करण्यात आले. अनेक दिव्यांगांना कृत्रिम अवयवदानाची उपकरणे न देता त्यासाठीचे बिल अदा करण्यात आल्याचा आरोप होता. यासाठी बनावट शिक्का, बनावट स्वाक्षरी आणि सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.