ED Summons Farooq Abdullah: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहे. ८६ वर्षीय फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. त्यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गेल्या महिन्यातही त्यांना याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाहीत. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन मनी लाँड्रिंगशी (money laundering case) संबंधित आहे.
अब्दुल्ला यांच्या विरोधात ईडीने २०२२ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (Jammu and Kashmir Cricket Association scam) अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाच्या विकासाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेला निधी इतरत्र वळवला आणि त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. नंतर हा पैसा आपापसात वाटून घेतला.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २०१८ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने २०२२ मध्ये हा गुन्हा नोंदवला आहे.
लोकसभेत श्रीनगरचे प्रतिनिधित्व करणारे ८६ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांना गेल्या महिन्यातही याच प्रकरणात तपास यंत्रणेने समन्स बजावले होते. अब्दुल्ला यांना पाठवलेल्या समन्समध्ये ईडीने त्यांना आपल्या श्रीनगर कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी प्रकृतीचे कारण सांगून ते हजर राहिले नाहीत.