Hemant Soren News : कथित जमीन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) आज झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला. या छाप्यात ईडीनं ३६ लाखांची रोकड, बीएमडब्लू कार व काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत.
जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं हेमंत सोरेन यांना दोन वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, सोरेन यांनी त्या समन्सला केराची टोपली दाखवली. त्यानंतर ईडीनं पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावलं. मात्र, सोरेन यांनी मेल करून ३१ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहू असं कळवलं. या समन्सनंतर सोरेन हे दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं ईडीनं काल त्यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला.
केंद्रीय तपास यंत्रणेचं एक पथक सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीतील शांती निकेतन येथील सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचलं. सुमारे १३ तास टीम तिथं थांबली. मात्र मुख्यमंत्री सोरेन तिथं नव्हते. ईडीच्या पथकानं घेतलेल्या झाडाझडतीत ३६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 'बेनामी' नावानं नोंदणीकृत हरियाणा नंबर प्लेट असलेली बीएमडब्ल्यू कारही सापडली. याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचेही सांगण्यात आलं आहे.
ईडीनं हेमंत सोरेन यांच्या घरात सापडलेल्या रोकड रकमेचं छायाचित्रही प्रसिद्ध केलं आहे. त्यात ५०० रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल दिसत आहेत. ही रक्कम ३६ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. ईडीच्या पथकानं ही रक्कम ताब्यात घेतली आहे.
ईडीची टीम सोमवारी सकाळी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचली, तेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन तिथं नव्हते. रविवारी रात्रीपर्यंत सोरेन या निवासस्थानी हजर असल्याचं सांगण्यात आलं. ईडीच्या छाप्याआधी ते घराबाहेर पडले, ते पुन्हा परतले नाहीत. सोरेन हे नेमके कुठं आहेत याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सोरेन रस्त्यानं झारखंडला रवाना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीला सोरेन यांची दुसऱ्यांदा चौकशी करायची आहे. याआधी २० जानेवारी रोजी रांचीमध्ये सोरेन यांची चौकशी करण्यात आली होती.
संबंधित बातम्या