दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi chief minister Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ईडीने दिल्लीतील एका न्यायालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल केली आहे. ईडीने आपल्या तक्रारीत दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यातील चौकशीत वारंवार समन्स बजावूनही त्याची दखल न घेतल्याने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी आठव्यांदा ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिल्यानंतर ही तक्रार करण्यात आली आहे.
केजरीवाल यांनी म्हटले होते की, ईडीचे समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीसीच्या कलम १७४ सह मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्याच्या (पीएमएलए) कलम ६३ (४) अंतर्गत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात राऊस अव्हेन्यू न्यायालयात नवीन तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांनी गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत केजरीवालांना जारी करण्यात आलेल्या पहिल्या तीन समन्सवर हजर न राहिल्याबद्दल ईडीने यापूर्वी स्थानिक न्यायालयात केजरीवालांविरुद्ध खटला चालवण्याची याचिका दाखल केली होती.
केजरीवाल यांनी ईडीच्या आठही समन्सना बेकायदेशीर म्हटले होते आणि १२ मार्चनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करा, असे ईडीला कळवले होते. आता ईडीने पुन्हा एकदा केजरीवालांविरोधात कोर्टात धाव घेतली असून याचा काय निर्णय होतो, हे उद्या स्पष्ट होणार आहे.