ECI On Delhi Elections : महाराष्ट्रानंतर संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. त्यानुसार, दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार, दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी मतदान होईल. निवडणूक आयोगानं नुकतीच निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय राजधानीत १ कोटी ५५ लाख २४ हजार ८५८ नोंदणीकृत मतदार असून, त्यात १.०९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
'भारतानं निवडणुकांचा एक सुवर्ण मानदंड स्थापित केला आहे. हा आमचा सामायिक वारसा आहे. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला वाव नाही. आयोगाची कार्यपद्धती इतकी स्पष्ट आहे. व्यक्तिगत काही चूक झाल्यास योग्य ती शिक्षा देण्यास आयोग सक्षम आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
आम आदमी पक्षाच्या आरोपांना उत्तरं
राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाच्या आरोपांनाही उत्तरं दिली. मतदार यादीतून नावं वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. मतदार यादीतून नावं वगळताना किंवा त्यात भर घालताना योग्य ती प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या फेरफाराला वाव नाही, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
'मतदार यादीच्या घोळाविषयीच्या चर्चा अजूनही सुरू आहेत. मात्र या प्रक्रियेत सुमारे ७० पायऱ्या आहेत... मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, मतदान केंद्रे, फॉर्म १७ (सी) आणि मतमोजणी केंद्रे, जिथं राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासोबत उपस्थित असतात. जेव्हा जेव्हा मतदार याद्या तयार होतात, नियमित बैठका घेतल्या जातात, फॉर्म ६ शिवाय ते होऊ शकत नाही, प्रत्येक भागाला बीएलए नियुक्त करण्याचा अधिकार आहे. जे काही दावे आणि आक्षेप घेतले जातात, ते एकाच वेळी प्रत्येक राजकीय पक्षाला दिले जातात; मसुदा संकेतस्थळावर टाकला जातो. जोपर्यंत फॉर्म ७ तयार होत नाही, तोपर्यंत डिलीट करणं शक्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी फेटाळला. 'ईव्हीएममध्ये कोणतीही कमतरता असल्याचा कोणताही पुरावा नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ईव्हीएममध्ये अवैध मतांचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणताही घोटाळा शक्य नाही, असं राजीव कुमार म्हणाले.
उच्च न्यायालयं आणि सर्वोच्च न्यायालय सातत्यानं वेगवेगळ्या निकालांमध्ये हे सांगत असतात... आणखी काय म्हणता येईल? मतमोजणीसाठी ईव्हीएम हे फुलप्रूफ साधन आहे. छेडछाडीचे आरोप निराधार आहेत. निवडणुका सुरू असताना आम्ही बोलू शकत नाही म्हणून आम्ही आता बोलत आहोत, असं ते म्हणाले.
मतदानाच्या आकडेवारीवरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. 'मतदानाची टक्केवारी बदलणं अशक्य आहे. काही पक्षाचे एजंट मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी अहवाल देतात. मतमोजणीपूर्वी फॉर्म १७ सी ची जुळवाजुळव केली जाते, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या