Visa Free Countries : जगातील जवळपास निम्म्या देशांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना जगातील विविध देशात प्रवास करणे खूप सोपे झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या १६ देशांनी व्हिसा फ्री एंट्री सुरू केली आहे. तर ४० देशांनी व्हिसा ऑन अरायव्हल सेवा देण्यास सुरूवात केली आहे. तर ४७ देशांनी ई-व्हिसा सेवा सुरू केली आहे. भारतीयांचा प्रवास सुकर करण्यासाठी जगातील इतर देशातही प्रक्रिया सुलभ व्हावी या साठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, व्हिसा प्रक्रियेसाठी सेवा देणे हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न असतो. या सोबतच भारतासोबतच्या संबंधांवरही व्हीझा फ्री सेवा अवलंबून आहे. भारताचे इतर देशांसोबतचे संबंध वाढत असताना सहज व्हिसा सुविधा देणाऱ्या देशांची संख्या देखील वाढत आहे. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, अनेक देशांशी व्हीझा मुक्त प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस या यादीत आणखी देशांचा समावेश केला जाऊ शकतो.
यामध्ये प्रामुख्याने थायलंड, भूतान, हाँगकाँग, मालदीव, मॉरिशस यांचा समावेश आहे. अनेक देश ई-व्हिसा आणि व्हिसा ऑन अरायव्हल या दोन्ही सुविधा देत आहेत. ई-व्हिसा सुविधा देणाऱ्या देशांमध्ये व्हिएतनाम, रशिया, यूएई, अझरबैजान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, अर्जेंटिना, बहरीन, मलेशिया, न्यूझीलंड, ओमान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान, युगांडा, उझबेकिस्तान इत्यादींचा समावेश आहे. अरायव्हल व्हिसा सुविधा देणाऱ्या देशांमध्ये फिजी, इंडोनेशिया, इराण, जमैका, जॉर्डन, नायजेरिया, कतार, झिम्बाब्वे, ट्युनिशिया इत्यादींचा समावेश होतो. यापैकी अनेक देश आहेत जे ई-व्हिसा आणि अरायव्हल व्हिसा या दोन्ही सुविधा देत आहेत.
ज्या देशांनी व्हिसा फ्री, अरायव्हल व्हिसा किंवा ई-व्हिसा ची सुविधा दिली आहे, ते फक्त टुरिस्ट व्हिसासाठीच लागू होतात. यामध्ये देशात राहण्याची परवानगी १५ दिवसांपासून ते कमाल तीन महिन्यांपर्यंत असते.
सुलभ व्हिसा प्रक्रियेचा फायदा म्हणजे दूतावासाकडून नियमित व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेत वेळ वाचतो. ई-व्हिसा, अरायव्हल व्हिसाची प्रक्रिया सोपी आहे. यामध्ये, अरायव्हल व्हिसा घेताना योग्य कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. ज्याच्या आधारे लगेच व्हिसा मिळतो. भारत अनेक देशांना ई-व्हिसा, अरायव्हल व्हिसा आणि व्हिसा फ्री एंट्री देखील देत आहे. भारत सुमारे १७० देशांनी भारतीयांना ई-व्हिसा सुविधा देत आहे, जपान, दक्षिण कोरिया, यूएईसह अनेक देशांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
भारतात व्हिसा मुक्त किंवा सुलभ व्हिसा प्रवेश देणाऱ्या देशांची संख्या भारताच्या पासपोर्टची ताकद वाढवेल. ग्लोबल पासपोर्ट रँकिंग २०२४ मध्ये भारत ८२ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी त्यांची रँक ८४ होती. त्यात सातत्याने सुधारणा होत आहे.