Earthquake in Nepal and North India : मंगळवारी सकाळी नेपाळसह देशाचा उत्तर भाग भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. यूपी, बिहारपासून दिल्लीपर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ सीमेजवळील तिबेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी नोंदवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेटमधील झिझांग भाग हा या भूकंपाचे केंद्र होते. एएनआय या वृत्तसंस्थेने भूकंपाचे काही व्हिडिओ फुटेज जारी केले आहेत. त्यानुसार बिहारमधील शिवहरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या व्हिडिओमध्ये घरातील दिवे, पंखे हलतांना दिसत आहे.
नेपाळमधील लोबुचेपासून ९३ किमी ईशान्येला ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नेपाळमध्ये या भुकपांत ९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भूकंपाची तीव्रता दिसून येत आहे. या व्हिडिओत भूकंपामुळे नागरिक भयभीत झाल्याचं दिसून येत आहे. तसेच काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले आहेत. भूकंपाच्या धक्यामुळे काही ठिकाणी झाडे आणि घरे थरथरताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सोमवारी सकाळी ३.७ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डहाणू तालुक्यात पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली. तालुक्यातील बोर्डी, दापचरी, तलासरी परिसरात पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले.
नेपाळमध्ये देखील २ जानेवारी ला ४.८ रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झाला होता, त्याचे धक्के राजधानी काठमांडू आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर रिसर्च इन सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजून २ मिनिटांनी ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून ७० किमी उत्तरेला सिंधुपालचौक जिल्ह्यात होता. भूकंपाचे धक्के काठमांडू आणि आसपासच्या जिल्ह्यांतील लोकांना जाणवले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एनएसआरसीच्या नोंदीनुसार, नेपाळमध्ये ३ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा हा नववा भूकंप होता, त्यापैकी आठ भूकंप पश्चिम नेपाळमध्ये गेल्या २० दिवसांत झाले आहेत.
-१. जर तुम्ही घरात असाल तर जमिनीवर खाली वाकून एखाद्या मजबूत वस्तूला धरून बसा.
२. हाताने चेहरा आणि डोके झाकून ठेवावे.
३ . घरात असाल तर खिडक्या, दरवाजे आणि भिंतीपासून दूर राहा.
४ . भूकंपाच्या वेळी तुम्ही पलंगावर असाल तर तिथेच थांबा, उशी डोक्यावर झाकून ठेवा.
५ . घराबाहेर पडल्यास इमारती, झाडे, पथदिवे, विजेच्या तारा आदींपासून दूर राहा.
६ . जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल तर भूकंपाचे धक्के कमी होईपर्यंत तिथेच थांबा.
७. भूकंप झाल्यास आपली गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवा आणि गाडीतच थांबा. इमारती किंवा झाडांपासून दूर राहा.
संबंधित बातम्या