CJI DY Chandrachud First Wife : भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीबाबत मोठे खुलासे केले आहे. एका लॉ-फर्मसाठी मुलाखत द्यायला गेल्यानंतर तिथं कामाची वेळ निश्चित नव्हती. परंतु त्यावेळी तिथं माझ्या पत्नीने 'वर्क लाईफ बॅलन्स'चा आग्रह धरला होता. त्यावेळी त्यांना 'काम करणारा पती शोधण्यास' सांगण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केला आहे. बंगळुरुतील नॅशनल स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात डीवाय चंद्रचूड यांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. त्यामुळं यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणाले की, माझी पहिली बायको ही एक वकील होती. त्यामुळं ती एका लॉ-फर्ममध्ये नोकरीच्या शोधात गेली. त्यावेळी तिला दिवसभर काम करावं लागेल आणि कुटुंबाला वेळ देता येणार नाही, असं सांगण्यात आलं. याशिवाय काम करणारा पती शोधा, असंही तेथील लोकांनी सांगितल्याचा खुलासा डीवाय चंद्रचूड यांनी केला आहे. परंतु आता स्थिती बदलत असून आरोग्य विचारात घेता घरून काम करणं गरजेचं झालं असल्याचंही डीवाय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. मागच्या चार वर्षातील पाच लॉ-क्लर्क या महिला झालेल्या आहे. त्यांना फोन करणं ही माझ्यासाठी सामान्य बाब असल्याचंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. डीवाय चंद्रचूड यांची पहिली पत्नी रश्मी चंद्रचूड यांचं २००७ साली कॅन्सरच्या आजाराने निधन झालं होतं.
महिला लॉ-क्लर्कना फोन केल्यानंतर त्या मला न घाबरता मासिक पाळीविषयी बोलतात. मी त्यांना नेहमीच घरून काम करण्याचा सल्ला देत असतो. याशिवाय त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा माझा प्रयत्न असतो. आम्ही सुप्रीम कोर्टातील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि महिलांच्या आरोग्याबाबतच्या अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्याचं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं वकील होण्याआधी व्यक्तीने चांगला माणूस होणं गरजेचं आहे. अनेक लोक आयुष्यभर केलेल्या वकिलीवर गर्व करतात, परंतु ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याच्या गंभीर मुद्द्याकडेही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी लक्ष वेधलं आहे.