मध्य अमेरिकेतील निकारागुआ देशामार्गे यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत (United States of America) बेकायदेशीरपणे घुसखोरी करण्याकडे अनेक भारतीय तरुणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसते. अशा प्रकारे अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी करण्यासाठी दुबईहून निकारागुआ या देशाला जाण्यासाठी निघालेले, ३०३ प्रवाशीसंख्या असलेले विमान २२ डिसेंबर २०२३ रोजी तांत्रिक कारणासाठी फ्रान्सच्या व्हेट्री विमानतळावर उतरले होते. विमानतळावर फ्रान्स पोलिसांना मानव तस्करीचा संशय आल्याने सर्व प्रवाशांची तपासणी झाली होती. विमानतळावर चार दिवस तपासाअंती विमानातील सर्व प्रवाशांना भारतात परत पाठवण्यात आले होते. दरम्यान, यातील ६६ तरुण हे गुजरातमधील रहिवासी होते. या तरुणांची गुजरातच्या सीआयडीने (Gujarat Crime Investigation Department) चौकशी केली असता प्रत्येक तरुणाने अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशासाठी इमिग्रेशन एजंटला ६०-८० लाख रुपयांपर्यंत रक्कम दिल्याचे मान्य केले आहे. गुजरात सीआयडीचे पोलीस अधिक्षक (गुन्हे आणि रेल्वे) संजय खरात यांच्या नेतृत्वाखाली सध्या हा तपास सुरू आहे. हे तरुण प्रामुख्याने अहमदाबाद, गांधीनगर, आणंद आणि मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी असून यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे खरात यांनी सांगितले.
‘एकूण ६६ पैकी ५५ तरुणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेकांनी इयत्ता ८ वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. दुबईमार्गे निकारागुआ पोहोचल्यानंतर तेथून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश मिळवून देण्यासाठी यापैकी प्रत्येकाने स्थानिक इमिग्रेशन एजंटना ६० ते ८० लाख रुपये मोजल्याचे कबूल केले आहे.’ असं खरात यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. या ५५ तरुणांना अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवरून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या जवळपास १५ एजंटांची नावे आणि संपर्क क्रमांकही तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. हे गुजराती तरुण अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांना पैसे पाठवावे असे एजंटसोबत ठरले होते, असं गुजराती तरुणांनी सांगितले.
निकारागुआला पोहचल्यानंतर एजंटची माणसे या तरुणांना अमेरिकेच्या सीमेपर्यंत घेऊन जाणार होते. आणि त्यांना सीमा ओलांडण्यास मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, हे तपासात उघड झाले आहे. एजंट्सनी या तरुणांसाठी हवाई तिकिटे देखील बुक केली होती. त्यांना आपात्कालिन खर्चासाठी १००० ते ३००० अमेरिकी डॉलर दिले होते. (अंदाजे ८३,००० ते २.५ लाख रुपये), असं खरात यांनी सांगितले.
एजंट्सने आखलेल्या योजनेनुसार गुजरातमधील ६६ तरुण १०-२० डिसेंबरदरम्यान अहमदाबाद, मुंबई आणि दिल्ली मार्गे दुबईला पोहोचले होते. त्यानंतर एजंटच्या सूचनेनुसार ते सर्वजण दुबईत निकाराग्वाला जाणार्या विमानात बसले होते, असं सीआयडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे. या ५५ तरुणांना दुबईचा व्हिसा मिळवून देणारे एजंट तसेच व्हिसा शुल्क भरणाऱ्या एजंट्सचे बँक डिटेल्स मिळवण्यासाठी सीबीआयची मदत घेणार असल्याचे खरात यांनी सांगितले.
अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांसाठी निकारागुआ हा देश लोकप्रिय ठरतो आहे. २०२३ या वर्षात तब्बल ९६,९१७ भारतीयांनी बेकायदेशीरपणे यूएसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता असं अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोल (Customs and Border Patrol) च्या आकडेवारीमध्ये स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या