Israel vs lebanon : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धानं आता टोक गाठलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेनं आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केलं आहे. नेत्यानाहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.
इस्राइल सरकारनं हा दावा केला असून हे ड्रोन लेबनॉनमधून आल्याचं म्हटलं आहे. एका इमारतीवर या ड्रोनचा स्फोट झाला. याशिवाय, या भागात आणखी दोन ड्रोन डागण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पंतप्रधान नेतान्याहू सुरक्षित असल्याचं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ड्रोन हल्ला झाला तेव्हा नेतान्याहू त्यावेळी आपल्या निवासस्थानी नव्हते. या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये सतर्कतेचं सायरन वाजवण्यात आलं.
हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहला इराणचा पाठिंबा आहे. इस्राइलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले तीव्र करणार असल्याचा इशारा शुक्रवारी हिजबुल्लाहनं दिला होता.
दहशतवादी संघटनेचा कमांडर हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाह आणि इराण हे दोन्ही देश संतापले आहेत. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार यालाही इस्रायलनं ठार केलं आहे. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांच्या हत्येमुळं युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इस्राइल अनेक आघाड्यांवर लढत आहे. एकीकडं हमास आणि दुसरीकडं हिजबुल्लाह आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सिनवार यांच्या हत्येचा निषेध केला आहे. हमास जिवंत आहे आणि सदैव जिवंत राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. खामेनी यांचं हे वक्तव्य पाहता, इराण या संघटनांच्या मदतीसाठी कोणतीही कसर सोडणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. इराणच्या मदतीनं हिजबुल्लाह आणि हमास हे दोन्ही देश इस्रायलविरोधातील युद्ध तीव्र करू शकतात.