Vikas Divyakirti decision on Drishti IAS : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी राजधानी दिल्लीतील एक प्रमुख संस्था असलेली विकास दिव्यकीर्ती यांची 'दृष्टी आयएएस' ही संस्था दिल्लीबाहेर हलवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थेचे वर्ग यापुढं मुखर्जी नगर ऐवजी नोएडा इथं होणार आहेत.
जुने राजिंदर नगरच्या तळघरात नागरी सेवेतील तीन परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर प्रशासनानं कारवाई करत दिल्लीतील अनेक आयएएस कोचिंग सेंटर सील केले. त्यात विकास दिव्यकीर्ती यांची दृष्टी आयएएस देखील होती. दृष्टी आयएएसवरील कारवाईची चर्चा देशभरात झाली होती. त्यामुळं दिव्यकीर्ती यांना माध्यमांसमोर येऊन खुलासेही करावे लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीबाहेर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.
दृष्टी आयएएस शिवाय इतरही काही संस्था आपलं कोचिंग सेंटर मुखर्जी नगरमधून इतर ठिकाणी हलवण्याचा विचार करत आहेत. तसं झाल्यास येत्या काळात मुखर्जी नगर पूर्णपणे रिकामं होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुरक्षेअभावी दिल्ली आणि केंद्र सरकारच्या नियमांचं पालन न होणं हे यामागचं मुख्य कारण आहे. अलीकडच्या काळात अग्निसुरक्षा, इमारतींची बांधकामे आणि सुरक्षेशी संबंधित अनेक प्रकारच्या एनओसी सरकारी नियमांनी ठरवून दिलेल्या मानकांनुसार नाहीत. आम्ही नोएडाच्या अनेक भागातील ठिकाणं पाहत आहोत, असं दृष्टी आयएएसच्या व्यवस्थापकीय मंडळांच्या सदस्यांनी सांगितलं.
मुखर्जी नगरमध्ये १०० हून अधिक कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत. सध्या सुरक्षिततेशी संबंधित निकषांची पूर्तता न करणं या प्रत्येक इन्स्टिट्यूटसाठी आव्हान बनलं आहे. २७ जुलै रोजी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यापासून राजेंद्र नगर आणि मुखर्जी नगर मधील १०० हून अधिक कोचिंग सेंटर सील करण्यात आले आहेत. या कारणांमुळं मुखर्जीनगरमधील छोट्या दुकानांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. थेट अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. आता त्या भागातील धावपळ कमी झाली आहे. त्यामुळं खाण्यापिण्याची, वाचन-लेखनाची दुकानंही कमी झाली आहेत.
कोचिंग क्लासेसनी मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कुठे जायचं याचीही चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे. दुसऱ्या ठिकाणी गेल्यास त्यांचं आर्थिक गणित कोलमडणार आहे. विद्यार्थ्यांना सहज स्थलांतर करता यावं, यासाठी काही संस्थांकडून राहण्यायोग्य इमारतींचाही विचार सुरू आहे, असंही सांगितलं जातं.