राज्यसभेत ३३ वर्षांची कारकिर्द गाजवल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवृत्त होत आहेत. त्यांच्यासोबतच राज्यसभेच्या ५४ खासदारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. यापैकी अनेक जण लोकसभा निवडणूक लढवत आहेत, तर काही खासदार असे आहेत जे पुन्हा राज्यसभेत नियुक्ती होऊत परतत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ३ एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षासोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. सोनिया आतापर्यंत लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी रायबरेलीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
मनमोहन सिंग १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर-
डॉ. मनमोहन सिंग यांना देशातील उदार आर्थिक धोरणासाठी ओळखले जाते. १९९१ मध्ये पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांनी पीव्ही नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद सांभाळले होते. त्यानंतर ते २००४ ते २०१४ पर्यंत १० वर्षे भारताचे पंतप्रधान होते. सध्या ते ९१ वर्षांचे आहेत.
७ केंद्रीय मंत्रीही होत आहेत निवृत्त -
निवृत्त होणाऱ्या ५४ खासदारांमध्ये सात केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे, त्यामध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया, माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखऱ, पशुपालन आणि मत्स्य पालन मंत्री पुरुषोत्तम रूपाला,परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन,सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि माहिती व प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन आदिंचा समावेश आहे. त्याचबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचा कार्यकाळही उद्या संपत आहे. यावेळी एल मुरुगन आणि अश्विनी वैष्णव वगळता अन्य सर्व जन निवृत्त होत आहेत.
मंगळवारी राज्यसबेतून ४९ सदस्य निवृत्त झाले तर बुधवारी ५ जण निवृत्त होत आहेत. अशा पद्धतीने एकूण ५४ जण निवृत्त होत आहेत. यामध्ये समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी नियक्त करण्यात आले आहे.
दरम्यान मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आता तुम्ही राज्यसभेत नसून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत आहात. मात्र यानंतरही तुमचा आवाज देशातील जनतेसाठी बुलंद होत जाईल. तीन दशकांहून अधिक काळ देशाची सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात,आज एका युगाचा अंत झाला आहे, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या