alaska airlines boeing 737 door breaks : अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या बोइंग विमानाचा दरवाजा अचानक तुटला. टेक ऑफ केल्यानंतर आकाशात सुमारे १६००० फूट उंच विमान गेल्यावर हा दरवाजा उडून गेला. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानात गोंधळ उडाला. विमान क्रॅश होईल या भीतीने नागरीक जिवाच्या आकांताने ओरडू लागले. विमानातील सर्व १७७ जणांचा जीव धोक्यात आला होता. आपत्कालीन परिस्थिती पाहता विमानाचे पोर्टलँड येथे एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अलास्का एअरलाइन्सचे फ्लाइट १२८२ पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.५२ वाजता निघाले होते, परंतु उड्डाणा नंतर काही क्षणात हा अपघात झाल्याने विमानाचे ५.३० वाजता पोर्टलँड विमानतळावर पुन्हा लँडिंग करण्यात आले. थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बोईंग ७३७-९ MAX फ्लाइट क्रमांक AS१२८२ हे विमान पोर्टलँड ते ओंटारियो, CA (कॅलिफोर्निया) येथून सुटल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. या विमानात १७१ प्रवासी होते. तर ६ क्रू मेंबर होते," असे अलास्का एअरलाइन्सने ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचा आम्ही तपास करू असे देखील एयर लाइन कंपनीने म्हटले आहे.
बोईंग ७३७ मॅक्स १ ऑक्टोबर २०२३ रोजी अलास्का एअरलाइन्सकडे हस्तांतरित करण्यात आले. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ते व्यावसायिक सेवेत दाखल झाले. Flightradar24 ने सांगितले की त्यांनी आतापर्यंत फक्त १४५ उड्डाणे पूर्ण केली आहेत. विमान हवेत गेल्यावर अचानक विमानाचा दरवाजा तुटल्याने प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला होता. भीतीने प्रवासी ओरडू लागले होते. मात्र, वैमानिकाने विमान सुरक्षित उतरवल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वा:स टाकला.