अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना'हश मनी'प्रकरणात ना शिक्षा झाली ना त्यांना कोणता दंड ठोठावला गेला. हा निर्णय देताना न्यायाधीशांनी त्यांच्यावर कोणत्या अटी-शर्थीही लादल्या नाहीत. ट्रम्प यांना पोर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. शुक्रवारी न्यूयॉर्कच्या न्यायालयाकडून ट्रम्प यांना शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र न्यायालयाने ट्रम्प यांना दिलासा दिल्याने त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वीच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मात्र, न्यायाधीशांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. त्यांना कोणतीही शिक्षा दिली जाणार नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. यामुळे आता व्हाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी त्यांच्यासमोर कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच हश मनी प्रकरण संपवले आहे. मात्र, कोणत्याही प्रकरणात दोषी ठरल्यानंतरही पदाची शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष असतील.
शिक्षेवरील सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. न्यायमूर्ती जुआन मार्चन यांनी शुक्रवारी त्यांची बिनशर्त सुटका केली. डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले असले तरी त्यांना शिक्षा झालेली नाही. ना त्यांना तुरुंगात जावे लागेल ना त्यांना दंड भरावा लागणार आहे. खचाखच भरलेल्या कोर्टरूममध्ये न्यायाधीशांनी हा निकाल दिला. त्यानंतर १० दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारादरम्यान तोंड बंद ठेवण्यासाठी एका अडल्ट स्टारला १ लाख ३० हजार डॉलर दिल्याचा आरोप आहे.
सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी कोणतीही चूक केली नाही. ते पुन्हा अध्यक्ष होऊ नयेत म्हणून निवडणुकीपूर्वी त्यांच्याविरोधात केवळ षड्यंत्र रचण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी वकील जशुआ स्टाईग्लास यांनी त्यांच्या वागणुकीचा निषेध केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या सुनावणीची वैधता कमी करण्यासाठी संपूर्ण मोहीम सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी दाखला दिला. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील करत आपली शिक्षा थांबवण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ५-४ असा निकाल देत त्यांचे अपील फेटाळून लावले.
गेल्या वर्षी मे महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले होते. डॅनियल्स या स्टारने ट्रम्प यांच्यासोबत सेक्स केल्याचा दावा केला आहे. ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी त्यांना पैसे मागितले होते.
संबंधित बातम्या