अमेरिका पुन्हा हादरली! अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर AK-47 ने गोळीबार, थोडक्यात वाचले!-donald trump assassination attempt again what happen when trump was playing at his golf courses ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अमेरिका पुन्हा हादरली! अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर AK-47 ने गोळीबार, थोडक्यात वाचले!

अमेरिका पुन्हा हादरली! अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर AK-47 ने गोळीबार, थोडक्यात वाचले!

Sep 16, 2024 12:28 PM IST

Donald Trump Assassination Attempt : डोनाल्ड ट्रम्प दोन महिन्यांत दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पेनसिल्व्हेनियामध्ये १३ जुलै रोजी झालेल्या रॅलीत त्यांच्यावर शार्प शूटरने गोळीबार केला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार! ४०० यार्ड दूर असलेल्या AK-47 मधून झाडल्या गोळ्या; थोडक्यात बचावले
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार! ४०० यार्ड दूर असलेल्या AK-47 मधून झाडल्या गोळ्या; थोडक्यात बचावले (AP)

Donald Trump Assassination Attempt : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ल्यातून बचावले. पेनसिल्व्हेनियामध्ये १३ जुलै रोजी झालेल्या रॅलीत त्यांच्यावर शार्प शूटरने गोळी झाडली होती. या घटनेतून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. ही घटना ताजी असताना रविवारी दुपारी फ्लोरिडा येथे एका गोल्फ क्लबमध्ये डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळत असतांना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यातून देखील डोनाल्ड ट्रम्प बचावले आहेत.

प्राथमिक तपासात ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु ते सुरक्षित असल्याचं सुरक्षा दलानी सांगितलं आहे. हल्लेखोर आणि ट्रम्प यांच्यात सुमारे ४०० यार्डांचे अंतर होते. संशयिताला एके-४७ रायफलसह अटक करण्यात आली आहे. झुडपात लपलेले आरोपी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर आपल्या पहिल्या वक्तव्यात ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले. मी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कधीही शरणागती पत्करणार नाही असे या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. मात्र, ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांना लक्ष्य करून हा गोळीबार करण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु अमेरिकन गुप्तचर सेवा एफबीआयने सांगितले की ते या प्रकरणाचा तपास सुरू असून प्रथमदर्शनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचे दिसते. फ्लोरिडा येथील पाम बीच काउंटी शेरिफ कार्यालयाच्या प्रवक्त्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

संशयित कोण?

गोल्फ कोर्टवर एके ४७ सह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रायन वेस्ली रॉथ असे आरोपीचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयिताने रायफल झुडपात टाकली होती. गोळीबार केल्यावर तो एसयूव्हीतून पळून जात होता. मात्र, पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. आरोपीचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदूकधारी दोन बॅकपॅक आणि एक गोप्रो कॅमेरा घेऊन गेला होता. आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्डही आहे. रॉथला २००२ मध्ये शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

नेमकं काय झालं?

स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंदूकधारी ट्रम्पपासून सुमारे ४०० यार्ड ते ५०० यार्ड दूर होता आणि झुडपात लपला होता. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प वेस्ट पाम बीच येथील त्यांच्याच आंतरराष्ट्रीय गोल्फ क्लबमध्ये गोल्फ खेळत होते. ट्रम्प या आठवड्याच्या शेवटी वेस्ट कोस्ट दौऱ्यावरून फ्लोरिडाला परतले. ट्रम्प अनेकदा सकाळचा वेळ गोल्फ खेळत घालवतात आणि ट्रंप इंटरनॅशनल गोल्फ क्लब वेस्ट पाम बीच येथे दुपारचे जेवण घेतात, या राज्या त्यांच्या मालकीचे तीन क्लब आहे. यापैकी एकावर ते खेळत होते. सुरक्षा दलाने या घटनेची माहिती त्वरित दिली नाही. परंतु एका सुरक्षा अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू आहे.

हल्ल्यानंतर काय म्हणले ट्रम्प ?

दुसऱ्या हत्येच्या प्रयत्नानंतर आपल्या समर्थकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मी माझ्या आजूबाजूला गोळीबाराचा आवाज ऐकला. पण अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी आत्मसमर्पण करणार नाही. रिपब्लिकन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांनी देखील या घटनेनंतर ट्रम्प यांच्याशी संवाद साधला.

जो बायडेन आणि कमला हॅरिस काय म्हणाल्या

या प्रकरणी व्हाईट हाऊसने सांगितले की, अध्यक्ष जो बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस या दोघांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की ट्रम्प सुरक्षित आहेत. अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी हॅरिसने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की त्यांना या गोळीबाराच्या वृत्ताची माहिती देण्यात आली होती. "डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहे याचा मला आनंद आहे. अमेरिकेत हिंसाचाराला जागा नाही, असे हॅरिस यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

Whats_app_banner
विभाग