Dombivli Nursery Shocking Video: कामानिमित्त घराबाहेर पडणारे पालक आपल्या मुलांना पाळणाघरात सोडून जातात. पाळणाघर सांभळणारे आपल्या मुलांची आई-वडिलांसारखीच काळजी घेतात, असा पालकांचा विश्वास असतो. परंतु, डोंबिवली येथील फडके रोडवरील हॅप्पी किड्स डे केअरमध्ये चिमुकल्यांना मारहाण आणि बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांमध्ये संतपाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पाळणाघरातील कर्मचारी आणि मालक यांच्याविरोधात रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधा नखरे यांच्यासह नर्सरी आणि डे केअर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, पत्नी आरती प्रभुणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. साधना सामंत या कर्मचाऱ्याने प्रभुणे यांना मुलांना मारहाण करताना पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला साधना यांनी विरोध केला. पण प्रभुणे यांनी तिचे ऐकले नाही. अखेर सामंत यांनी मुलांना मारहाण करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेत्या कविता गावंड यांना पाठवला. त्यानंतर कविता गावंडे यांनी संबंधित पालकांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावंड यांच्यासह पालकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
रामनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हॅप्पी किड्स डे केअरमध्ये सुमारे नऊ मुले आहेत. या पाळणाघरात हान मुलांना बांधून मारहाण केली जात होती. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. याप्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलांचे पालक करीत आहेत.
संबंधित बातम्या