डोंबिवलीतील फायनान्स कंपनीत घडलं चक्रावून टाकणारं कांड, ऑडिटमधून समोर आला धक्कादायक प्रकार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  डोंबिवलीतील फायनान्स कंपनीत घडलं चक्रावून टाकणारं कांड, ऑडिटमधून समोर आला धक्कादायक प्रकार

डोंबिवलीतील फायनान्स कंपनीत घडलं चक्रावून टाकणारं कांड, ऑडिटमधून समोर आला धक्कादायक प्रकार

Jul 31, 2024 11:52 AM IST

Dombivali Finance Firm Gold Stealing: मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने फायनान्स कंपनीतून २१ कोटींचे सोने चोरणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. ही घटना डोंबिवली येथे घडली.

डोंबिवलीत फायनान्स कंपनीतून २१ कोटींच्या सोन्याची चोरी
डोंबिवलीत फायनान्स कंपनीतून २१ कोटींच्या सोन्याची चोरी

Dombivli Gold Theft News: बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले २९ किलो सोने चोरून त्याचा वापर शेअर बाजारमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज मिळवण्यासाठी केल्याप्रकरणी एका फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने एप्रिल महिन्यात लेखापरीक्षणादरम्यान उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या तपासानंतर शिवकुमार आयर (३०), शिवाजी पाटील (२९) आणि सचिन साळुंखे (४१) यांना अटक केली.

रोव्हर फायनान्सच्या डोंबिवली शाखेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या आयर आणि एरिया हेड पाटील यांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बँकेच्या लॉकरमधून विविध ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची २६० पाकिटे काढून घेतली. त्यानंतर त्यांनी या सोन्याचा वापर खासगी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी केला आणि त्यातून मिळालेले पैसे साळुंखे या सराफा व्यापाऱ्यामार्फत शेअर बाजारात गुंतवले, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.

लेखापरीक्षणात सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे सोने गहाळ झाल्याचे समोर आल्यानंतर ही योजना उघडकीस आली. अंतर्गत चौकशीत आयर व पाटील यांच्याकडे लॉकरमध्ये प्रवेश व चाव्या असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला थेट उत्तरे देणे टाळले, मात्र नंतर वस्तुस्थिती सांगितली, असे या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी आकाश पाचलोद यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०८, ४०९, ५०६ (२), १२० (ब) आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासकर्त्यांनी आयरच्या बँक स्टेटमेंटची पडताळणी केली, व्यवहार आणि शेअर बाजारातील त्याच्या गुंतवणुकीचा शोध घेतला. या तिन्ही संशयितांना मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे: क्रिप्टोकरन्सी चोरीप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील बावधन येथील २६ वर्षीय तरुणाला धमकावून त्याचे १६ लाख रुपये किमतीचे बिटकॉईन बळजबरीने चोरल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालेवाडी-शिक्रापूर परिसरात २२ ते २४ जुलै दरम्यान ही घटना घडली. उमेश हेडाव असे फिर्यादीचे नाव असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ३१० (२), १४० (२) आणि आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर कैलास आमोडकर (रा. जळगाव) असे या आरोपीचे नाव आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेडव हा शेअर बाजारात असून आमोदकर व त्याच्या साथीदारांनी शेअर बाजाराच्या कोर्सला जाण्याचे नाटक केले. त्यांना कारमधून शिक्रापूर येथे नेऊन चाकूचा धाक दाखवून धमकावले, तोंड दाबून मोबाइलमधील बिटकॉईन्सचा पासवर्ड शेअर करून त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला रस्त्याच्या कडेला फेकून सर्व आरोपी फरार झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर