पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सरकादरी सागर दत्ता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर रुग्णाच्या कुटुंबीयांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. याविरोधात कनिष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांनी शनिवारीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. कोलकात्याजवळील कमरहाटी येथील रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. यावर रुग्णालय कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर आणि परिचारिकांनी शुक्रवारी रात्री उशिरा 'काम थांबवा' आंदोलन सुरू केले. हे आंदोलन शनिवारीही सुरू होते.
या घटनेत तीन कनिष्ठ डॉक्टर, तीन परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर कनिष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांनी चांगल्या सुरक्षा व्यवस्थेच्या मागणीसाठी 'काम बंद' आंदोलन पुकारले आहे. मृत रुग्ण मध्यमवयीन महिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना श्वसनाचा तीव्र त्रास होत होता आणि त्यांची प्रकृतीही चिंताजनक होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने या रुग्णाला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चांगली नव्हती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला पण खूप उशीर झाला होता आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
परिचारिकेने सांगितले की, रुग्णालयात पोलिस उपस्थित असतानाही रुग्णाच्या कुटुंबातील सुमारे १५ ते २० सदस्यांनी महिला वॉर्डमध्ये घुसून तेथील इतर रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक परिचारिका आणि डॉक्टरांवर हल्ला केला. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि रुग्णालयातील वॉर्डमध्ये योग्य सुरक्षा व्यवस्था असावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. आमच्या सुरक्षेच्या मागणीबाबत राज्य प्रशासन अजूनही जागे झालेले नाही, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जोपर्यंत पुरेशा सुरक्षेची आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे.
या घटनेची तक्रार रुग्णालय प्रशासनाने कमरहाटी पोलिस ठाण्यात दाखल केली असून तपास सुरू आहे, अशी माहिती बॅरकपूर पोलीस आयुक्तालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांची गस्त पथके पाळत ठेवून आहेत. पश्चिम बंगाल ज्युनिअर डॉक्टर फोरमचे सदस्य अनिकेत महतो म्हणाले, 'आम्ही यापूर्वीही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. जोपर्यंत सरकार कृतीशील पावले उचलत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. '