कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील एका रुग्णालयात काम करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील (४५) यांचे शनिवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्याचे अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्या भावाकडे सहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, काही तासांनंतर डॉक्टरांना घरी जाण्यासाठी ३०० रुपये देऊन सोडून देण्यात आले.
सूर्यनारायणपेट येथील शनेश्वर मंदिराजवळ डॉ. सुनील मॉर्निंग वॉकला गेले असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा इंडिगो कारमधून एक टोळी आली आणि त्यांना जबरदस्तीने सुनील यांना गाडीत बसवले आणि पसार झाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अपहरणानंतर डॉ. सुनील यांचा भाऊ वेणुगोपाल गुप्ता यांच्याशी अपहरणकर्त्यांनी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधला होता. वेणुगोपाल हे जिल्हा मद्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना सहा कोटी रुपयांची खंडणी आणि त्यातील निम्मी रक्कम सोन्याच्या स्वरूपात देण्यास सांगण्यात आले.
गुप्ता यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून जिल्ह्यातील सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले. परंतु, रात्री आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला निर्जन स्थळी सोडले आणि घरी परतण्यासाठी ३०० रुपये दिले.
पोलिसांनी सांगितले की, डॉ. सुनील यांना मोठा धक्का बसला आहे. अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी आमचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून माहिती गोळा केली जात आहे. डॉक्टर सुनील यांचा भाऊ दारूचा व्यवसाय करत असल्याने या अपहरणामागे काही व्यावसायिक वैमनस्य आहे का, याचाही तपास केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अपहरणकर्त्यांबाबत सुगावा गोळा करण्यात व्यस्त आहेत.
संबंधित बातम्या